Thief Files Complaint : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये कायद्याच्या चौकटीला चक्रावून टाकणारी एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका चोराने, आपल्याला मारहाण झाल्याचा दावा करत चक्क घरमालक आणि जमावाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. सांपिगेहल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय? चोरीचा प्रयत्न अन् राडा
तक्रारदार चोराचे नाव अजगर खान असून तो आरटी नगरचा रहिवासी आहे. पेशाने ऑटोरिक्षा चालक असलेल्या अजगरला दारू आणि सिगारेटचे व्यसन आहे. हे खर्च भागवण्यासाठी तो भंगार आणि विद्युत उपकरणांची चोरी करतो. 31 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास, अजगर त्याच्या दोन साथीदारांसह (रज्जाक आणि श्याम) चोक्कनहल्ली येथील एका घराच्या कंपाऊंडमध्ये शिरला. विद्युत उपकरणे चोरत असताना घरमालक आणि एका महिलेने त्याला रंगेहात पकडले.
हेही वाचा - Rohit Shetty Firing Case: रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबारासाठी कुणी पुरवले शस्त्र? मुंबई गुन्हे शाखेचा मोठा गौप्यस्फोट
झटापटीत बिअरची बाटली अन् लाकडाने हल्ला
पकडले गेल्यावर अजगरने घरमालकावरच हल्ला चढवला. त्याचे साथीदार मदतीला धावून आले आणि रज्जाक नावाच्या साथीदाराने घरमालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या झटापटीत घरातील महिलाही जखमी झाली. आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले, तेव्हा अजगरचे दोन्ही साथीदार रिक्षा घेऊन पळून गेले. मात्र, संतापलेल्या जमावापैकी एकाने अजगरच्या डोक्यावर लाकडाने प्रहार केला, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत (फ्रॅक्चर) झाली.
पोलिसांकडून तपास सुरू
जखमी अजगरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण होताच, त्याने पोलीस ठाणे गाठले आणि आपल्याला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करत एफआयआर (FIR) दाखल केला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. "चोर देखील स्वतःला 'बळी' (Victim) म्हणून सादर करू शकतो का?" असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. पोलीस सध्या दोन्ही बाजूंच्या जबाबांची पडताळणी करत असून तपास सुरू आहे.