Friday, February 13, 2026 01:39:49 AM

Gold Silver Rate Today: सराफा बाजारात भूकंप ! चांदी 3 लाखांच्या उंबरठ्यावर तर सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक

चांदीच्या किमती आता 3 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्या असून, या दरवाढीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य खरेदीदार आणि ग्राहकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

gold silver rate today सराफा बाजारात भूकंप  चांदी 3 लाखांच्या उंबरठ्यावर तर सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक

Gold Silver Rate Today: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मौल्यवान धातूंच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दरातील तेजी सातत्याने कायम असतानाच, चांदीने मात्र आज सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. चांदीच्या किमती आता 3 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्या असून, या दरवाढीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य खरेदीदार आणि ग्राहकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

आजचे ताजे दर: सोन्या-चांदीची घोडदौड 

जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम आज स्थानिक किमतींवर दिसून आला. चांदीच्या वायद्याच्या किमतीत 1100 रुपयांची वाढ होऊन तो 2,86,948 रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. बाजारातील ही स्थिती पाहता चांदी लवकरच 3 लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सोन्याच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, वायद्याच्या किमतीत 800 रुपयांची वाढ होऊन दर 1,43,809 रुपयांवर स्थिर आहेत. सराफा बाजारात (Retail Market) 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,010 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,010 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा - Insurance Fraud: एका वर्षात 26 हजारांहून अधिक लोकांची चुकीच्या विम्याने फसवणूक! IRDAI चा धक्कादायक अहवाल

दरवाढीमागील जागतिक राजकीय कारणे 

तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरातील या 'वावटळी'ला आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणाव प्रामुख्याने कारणीभूत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष, तसेच अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वादामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार सोन्या-चांदीकडे वळत आहेत. तसेच, शेअर बाजारातील चढ-उतार आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे मौल्यवान धातूंच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

हेही वाचा - NPS Vatsalya Scheme: शिक्षण असो किंवा लग्न, आता मुलांच्या पेन्शन खात्यातून ऐनवेळी काढता येणार 'इतके' रुपये

गुंतवणूकदार मालामाल, ग्राहक हवालदिल 

मागील वर्षाप्रमाणेच यंदाही सोन्या-चांदीने गुंतवणुकीवर बंपर परतावा (Returns) देण्यास सुरुवात केल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव दीड लाखाच्या घरात पोहोचल्याने सामान्य ग्राहकांना दागिने खरेदी करणे आता आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित होत नाही आणि आर्थिक अनिश्चितता संपत नाही, तोपर्यंत मौल्यवान धातूंचे दर वाढलेले राहण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.


सम्बन्धित सामग्री