Sunday, March 08, 2026 11:56:42 PM

Chenab River Project : पाकिस्तानचं पाणी थांबवल्यानंतर भारताचे मोठे पाऊल; चिनाब नदीवर 5129 कोटींचा मेगा प्रोजेक्ट सुरू

केंद्र सरकारने चिनाब नदीवर 5,129 कोटी रुपयांच्या मेगा 'सावलकोट जलविद्युत प्रकल्पा'ला हिरवा कंदील दाखवला असून, त्याचे काम अधिकृतपणे सुरू झाले आहे.

chenab river project  पाकिस्तानचं पाणी थांबवल्यानंतर भारताचे मोठे पाऊल चिनाब नदीवर 5129 कोटींचा मेगा प्रोजेक्ट सुरू

Chenab River Project :  सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या जलविद्युत प्रकल्पांना गती दिली आहे. केंद्र सरकारने चिनाब नदीवर 5,129 कोटी रुपयांच्या मेगा 'सावलकोट जलविद्युत प्रकल्पा'ला हिरवा कंदील दाखवला असून, त्याचे काम अधिकृतपणे सुरू झाले आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या चर्चेनंतर मंजुरी मिळालेला हा पहिलाच मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चिनाब नदीवर बागलिहार प्रकल्पाच्या वरच्या बाजूला आणि सलाल प्रकल्पाच्या खालच्या भागात उधमपूर आणि रामबन जिल्ह्यांच्या हद्दीत उभारला जाणार आहे.

प्रकल्पाची क्षमता आणि तांत्रिक तपशील
सावलकोट जलविद्युत प्रकल्प हा एकूण 1,856 मेगावॅट क्षमतेचा असून तो दोन टप्प्यांत पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यात 1,406 मेगावॅट आणि दुसऱ्या टप्प्यात 450 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. हा एक 'रन-ऑफ-द-रिव्हर' प्रकल्प असणार आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) ने 5 फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाच्या बांधकामासाठी जागतिक स्तरावर कंपन्यांना निविदा प्रक्रियेद्वारे आमंत्रित केले आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने गेल्या ऑक्टोबरमध्येच या प्रकल्पाला मंजुरी दिली होती, त्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी आणि आव्हाने
या प्रकल्पाचे स्वरूप आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, तो पूर्ण होण्यासाठी सुमारे 9 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातील सर्व भूमिगत आणि पृष्ठभागावरील कामांसाठी प्रत्येकी 12 महिन्यांचा प्राथमिक कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात कामाचा वेग 50 टक्के असेल, तर मान्सून नसलेल्या काळात काम पूर्ण क्षमतेने सुरू राहील. धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, केंद्र सरकारने हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - Rafale Deal : भारतीय हवाई दलाची शक्ती वाढणार; 114 राफेल विमानांसाठी फ्रान्ससोबत मेगा करार होण्याची शक्यता

जम्मू-काश्मीरमधील इतर प्रकल्पांनाही मिळणार गती
सावलकोटसोबतच सरकारने चिनाब खोऱ्यातील इतर चार प्रमुख प्रकल्पांनाही 'डेडलॅईन' दिली आहे. 'पाकल दुल' आणि 'किरू' प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत, तर 'क्वार' प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील किश्तवारमधील 1,000 मेगावॅटचा पाकल दुल प्रकल्प हा चिनाब खोऱ्यातील सर्वात मोठा आणि 167 मीटर उंचीसह भारतातील सर्वात उंच धरणांपैकी एक असेल. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास भारताची ऊर्जा सुरक्षा वाढण्यासोबतच या प्रदेशावरील धोरणात्मक पकड अधिक मजबूत होईल.


सम्बन्धित सामग्री