Air India Employee Termination: टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने गेल्या 3 वर्षांत 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने घेतलेल्या या धडक कारवाईचे मुख्य कारण नैतिक वर्तनाशी संबंधित नियमांचे उल्लंघन असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी आयोजित 'टाउन हॉल' बैठकीत कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी ही माहिती दिली. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असून, दरवर्षी शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा याच कारणास्तव संपुष्टात आणली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
तस्करी आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
विल्सन यांनी बैठकीत नमूद केल्यानुसार, कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश होता, ज्यांनी एअर इंडियाच्या विमानांतून वस्तूंची तस्करी केली होती. तसेच, काही कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान (Excess Baggage) नेण्याची परवानगी दिली होती आणि त्यासाठी आवश्यक असलेले शुल्क आकारले नव्हते. याशिवाय, 'एम्प्लॉई लीव्ह ट्रॅव्हल' (ELT) योजनेचा गैरवापर केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मार्चमधील अहवालानुसार, सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांनी या धोरणात अनियमितता केल्याचे आढळले असून, दोषींवर दंड आकारण्यासह विविध सुधारणात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
वेतनवाढ गोठवली; खर्च कपातीवर भर
सध्या एअर इंडियाकडे सुमारे 24,000 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कंपनीवर असलेला आर्थिक दबाव पाहता व्यवस्थापनाने यावर्षी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीला (इन्क्रिमेंट) स्थगिती दिली आहे. खर्च कपातीचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टाटा समूहाची ही विमान कंपनी सध्या मोठ्या आर्थिक बदलांमधून जात असून तोटा कमी करण्यासाठी कठोर पावले उचलत आहे.
हेही वाचा - EPFO Major Rule Change: 12 वर्षांनी EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर मिळणार बक्कळ पेन्शन, पण सध्या खिशाला लागणार कात्री?
मध्यपूर्वेतील तणावाचा विमान क्षेत्राला फटका
येणारे आर्थिक वर्ष कंपनीसाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचे विल्सन यांनी सांगितले. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, परिणामी विमान इंधन (ATF) महाग झाले आहे. यामुळे कंपन्यांच्या परिचालन खर्चात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसला एकत्रितपणे ₹22,000 कोटींहून अधिक तोटा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर मध्यपूर्वेतील परिस्थिती सुधारली नाही, तर एअर इंडियाच्या आर्थिक अडचणीत अधिकच भर पडू शकते.