Sunday, December 14, 2025 10:49:46 AM

Anmol Bishnoi: अनमोल बिश्‍नोईची अमेरिकेतून हकालपट्टी; भारतात परतल्यावर त्याचे पाय आणखीन खोलात

भारतात प्रत्यार्पित केल्याने मुंबईतील सलमान खान फायरिंग, बाबा सिद्दीकी हत्या कट, आणि सिद्धू मूसेवाला प्रकरणांसह अनेक हाय-प्रोफाइल तपासांना मोठे वळण मिळणार आहे.

anmol bishnoi अनमोल बिश्‍नोईची अमेरिकेतून हकालपट्टी भारतात परतल्यावर त्याचे पाय आणखीन खोलात

नवी दिल्ली: देशातील सर्वाधिक वाँटेड गुन्हेगारांपैकी एक आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्‍नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्‍नोई याला अमेरिकेने भारतात माघारी पाठवले आहे. यामुळे मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांच्या तपासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या Department of Homeland Security (DHS) ने मंगळवारी माजी एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबाला ई-मेलद्वारे अधिकृत कळवले की अनमोल बिश्‍नोईला अमेरिकेतून 'हाकलून' देण्यात आले आहे. DHS ने सांगितले की 18 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला देशाबाहेर काढण्यात आले. बिश्‍नोई सध्या विमानाने भारताकडे येत असून बुधवारी दिल्लीला पोहोचणार आहे.

अनमोल बिश्‍नोई हा पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील असून 2021 मध्ये बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पळाला होता. तो आधी नेपाळ, नंतर दुबई, केनिया आणि त्यानंतर अमेरिकेत पोहोचला. एप्रिल 2023 मध्ये कॅलिफोर्नियातील बेकर्‍सफील्ड येथे तो शेवटचा सार्वजनिकपणे दिसला होता. बनावट पासपोर्ट प्रकरणात US Immigration and Customs Enforcement ने त्याला अटक केली होती. त्याला लोवामधील Pottawattamie County जेलमध्ये ठेवण्यात आले होते. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी सांगितले की, “आम्ही अमेरिकेतील संबंधित विभागांमध्ये ‘victims of crime’ म्हणून नोंदणी केली होती. 18 नोव्हेंबर रोजी आम्हाला त्याच्या डिपोर्टेशनची माहिती मिळाली. आम्हाला मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी करावी. माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणात आणि सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगमध्ये त्याची भूमिका स्पष्ट व्हायला हवी.”

हेही वाचा: Viral Story: असं काय झालं की अवघ्या काही तासांतच तरुणाने नोकरी सोडली? म्हणाला, ‘पहिल्या तीन तासांत…

अनमोल बिश्‍नोईवर भारतात 18 गंभीर गुन्हे आहेत. यामध्ये माजी मंत्री आणि एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या कटाचा आरोप सर्वात गंभीर आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांना मुंबईत गोळ्या घालून ठार केले. एप्रिल 2024 मध्ये अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथील घराबाहेर झालेल्या फायरिंगमध्येही त्याचे नाव समोर आले आहे. मे 2022 मध्ये पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येच्या कटातही अनमोलची भूमिका असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. लॉरेन्स बिश्‍नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याबरोबर या प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. NIA ने अनमोलला “most wanted” घोषित केले असून त्याच्या अटकेसाठी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, अनमोल परदेशातून लॉरेन्स बिश्‍नोई गँगसाठी मुख्य समन्वयक म्हणून काम करत होता. त्याने वेस्ट आशिया, ईस्ट आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क वाढवून मोठे नेटवर्क तयार केले. NIA च्या आरोपपत्रानुसार, अनमोल आणि गोल्डी ब्रार यांनी ड्रग्स तस्करी, शस्त्रांची तस्करी, सुपारी किलिंग आणि खंडणीसाठी परदेशातून निधी उभा केला. ते कॅनडा, अमेरिका, नेपाळ, पाकिस्तान आणि इतर देशांतील प्रो-खालिस्तान गटांशी संपर्कात असल्याचा आरोप आहे. ED देखील Prevention of Money Laundering Act (PMLA) अंतर्गत बिश्‍नोई गँगच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करत आहे. NIAच्या मते, अनमोलच्या भारतात परत येण्यामुळे या जागतिक गुन्हेगारी जाळ्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात.

हेही वाचा:  Mumbai Airport : बरीच विमाने रद्द, काहींचे मार्ग बदलले... , मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार बंद; कारण काय?


सम्बन्धित सामग्री