Delhi Artificial Rain: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जाहीर केले आहे की राजधानीत क्लाउड सीडिंगद्वारे पहिला कृत्रिम पाऊस 29 ऑक्टोबर रोजी पाडला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पावसाच्या चर्चेला जोर आला होता. अखेर सरकारने अधिकृत तारीख स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या, 'दिल्लीमध्ये पहिल्यांदाच क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज बुरारी परिसरात तज्ञांनी याची यशस्वी चाचणी घेतली. हवामान खात्याने 28, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. जर हवामान अनुकूल राहिले, तर 29 ऑक्टोबरला दिल्लीवर कृत्रिम पाऊस पाडला जाईल. हा तांत्रिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या ऐतिहासिक उपक्रम ठरेल.'
हेही वाचा - Shashi Tharoor On Trump: डोनाल्ड ट्रम्पच्या तेल खरेदी विधानावर शशी थरूर यांचा पलटवार; म्हणाले, 'भारत स्वतःचे निर्णय घेईल'
रेखा गुप्ता यांनी पुढे सांगितले की, या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता कमी करणे आणि स्वच्छ हवेचा श्वास पुन्हा मिळवणे आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील काही महिन्यांत इतर भागांमध्येही क्लाउड सीडिंगद्वारे पावसाचे नियोजन केले जाईल.
आयआयटी कानपूरचे योगदान
पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की आज झालेल्या चाचणीसाठी आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी क्लाउड सीडिंग केले. हे क्लाउड सीडिंग मेरठ, खेकरा, बुरारी, सादकपूर, भोजपूर आणि अलीगढ या भागांवरून पार पडले. या चाचणीदरम्यान विमान सुमारे 40 ते 50 मिनिटे दिल्लीच्या आकाशात होते. प्राथमिक चाचणी उत्तर दिल्लीतील बुरारी परिसरातच करण्यात आली. सरकारच्या मते, जर हवामान खात्याने ढगांची उपस्थिती निश्चित केली, तर पुढील पाऊस करोल बाग, आनंद विहार आणि दक्षिण दिल्लीतील भागांवरही पाडला जाईल.
हेही वाचा - Defence Ministry: 79 हजार कोटींच्या लष्करी प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने तिन्ही सशस्त्र दलांची ताकद वाढणार
प्रदूषण नियंत्रणासाठी नवा प्रयोग
दिल्लीतील प्रदूषण गेल्या काही आठवड्यांपासून धोकादायक पातळीवर आहे. परिणामी शाळा बंद ठेवण्याची वेळ येत आहे. त्यामुळे हा कृत्रिम पावसाचा प्रयोग केवळ तांत्रिक नव्हे तर पर्यावरणीय सुधारासाठीचा क्रांतिकारी प्रयत्न मानला जात आहे.