नवी दिल्ली : आशिया कप 2024 संपून महिना उलटला, पण भारताने जिंकलेली ट्रॉफी अजूनही बीसीसीआयच्या ताब्यात आलेली नाही. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वीने ट्रॉफी न सुपूर्द केल्याने भारतीय मंडळ आता गंभीर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने या प्रकरणी आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि नक्वीला अनेकदा इशारे दिले असले, तरी परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. बीसीसीआय आता दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) चार दिवसांच्या बैठकीत हा मुद्दा अधिकृतपणे मांडणार आहे.
या बैठकीत नक्वीना आयसीसीच्या नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, नक्वी ही बैठक टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्वीने “देशांतर्गत राजकीय कारणांमुळे व्यस्त असल्याचे” सांगत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की, नक्वी बीसीसीआयसमोर उभं राहण्याचं टाळत आहे. कारण, भारताविरुद्ध त्यांनी पूर्वी केलेली विधानं आणि आशिया कपदरम्यान घेतलेले वादग्रस्त निर्णय हे भारतीय मंडळाला मान्य नाहीत. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आधीच नक्वीच्या वर्तनामुळे नाराज आहेत.
हेही वाचा: Drone Bill 2025: "एअरमॉडेलिंगला ड्रोन कायद्यापासून द्यावी सूट" IAMA चा केंद्र सरकारकडे आग्रह
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवलं होतं. मात्र त्या वेळी टीम इंडियाने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले असताना ही घटना घडली आणि त्यानंतर नक्वीनी ट्रॉफी भारताला पाठवण्यास विलंब लावला. बीसीसीआयने अधिकृत पत्र पाठवून ट्रॉफी मुंबईला पाठवावी, अशी मागणी केली होती. मात्र नक्वीने पुन्हा एक नवीन अट ठेवली आहे. त्यानी म्हटलं आहे की, “10 नोव्हेंबर रोजी दुबईत आयोजित विशेष समारंभात मी बीसीसीआयच्या प्रतिनिधी आणि भारतीय खेळाडूंना वैयक्तिकरित्या ट्रॉफी सुपूर्द करीन.” पण बीसीसीआयला हा विलंब मान्य नाही.
मंडळाच्या सूत्रांनी सांगितलं की, “विजेत्या संघाला ट्रॉफी त्वरित देणं ही एसीसीची जबाबदारी आहे, ती टाळता येत नाही.” दरम्यान, आयसीसीच्या या बैठकीत बीसीसीआय हा विषय औपचारिकरित्या मांडणार असल्याचे निश्चित झाले आहे. जर नक्वी अनुपस्थित राहिला, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा प्रशासकीय चौकशीची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: Maharashtra Elections: आचारसंहिता लागू होण्याआधीच शासनाचा मोठा निर्णय! महत्त्वाच्या बदलावर शिक्कामोर्तब; बाळासाहेबांची 'ती' इच्छा अखेर पूर्ण