Bank strike: देशातील बँकिंग सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाच दिवसांच्या कामकाजाच्या मागणीसाठी 27 जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवहार सलग तीन दिवस प्रभावित होऊ शकतात. 25 आणि 26 जानेवारी हे आधीच सुट्टीचे दिवस असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या संघटनेने हा निर्णय घेतला असून, या फोरममध्ये देशातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नऊ प्रमुख संघटना सहभागी आहेत. UFBU च्या मते, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे ही त्यांची न्याय्य आणि रास्त मागणी असूनही सरकारकडून यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.
या संपाबाबत केंद्र सरकार आणि बँक संघटनांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी मुख्य कामगार आयुक्तांनी सलोखा बैठक घेतली होती. या बैठकीला भारतीय बँक संघटना (IBA), विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, सविस्तर चर्चा होऊनही कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने अखेर संप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती UFBU कडून देण्यात आली आहे.
सध्या बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारी सुट्टी मिळते. मात्र, मार्च 2024 मध्ये झालेल्या वेतन कराराच्या वेळी सर्व शनिवार सुट्टी देण्याबाबत IBA आणि UFBU यांच्यात सहमती झाली होती. तरीही अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
UFBU चे म्हणणे आहे की, पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यास कामाचे तास कमी होणार नाहीत. उलट, सोमवार ते शुक्रवार दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास कर्मचारी तयार आहेत. त्यामुळे कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असा त्यांचा दावा आहे. रिझर्व्ह बँक, एलआयसी, जीआयसी, शेअर बाजार तसेच अनेक सरकारी कार्यालयांमध्ये आधीच पाच दिवसांचा आठवडा लागू असताना बँकांनाच वेगळे ठेवण्याचे कारण काय, असा सवालही संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या संपाचा परिणाम मुख्यतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर होण्याची शक्यता आहे. एटीएम सेवा, शाखांतील व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि इतर महत्त्वाच्या सेवा विस्कळीत होऊ शकतात. मात्र, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यांसारख्या मोठ्या खासगी बँकांच्या शाखांवर या संपाचा थेट परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
ग्राहकांनी या कालावधीत आवश्यक बँक व्यवहार आधीच पूर्ण करून ठेवावेत, असे आवाहन अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून करण्यात आले आहे. सरकार आणि बँक संघटनांमध्ये शेवटच्या क्षणी तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.