Monday, February 09, 2026 02:20:12 PM

IndiGo Flights Cancelled : विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी, इंडिगोची 'या' देशांतील उड्डाणे रद्द; स्पाइसजेटकडूनही अलर्ट जारी

देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने 28 जानेवारीपर्यंत काही ठराविक आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची आपली उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

indigo flights cancelled  विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी इंडिगोची या देशांतील उड्डाणे रद्द स्पाइसजेटकडूनही अलर्ट जारी

IndiGo Flights Cancelled : इराण आणि आसपासच्या प्रदेशातील वाढत्या तणावाचा थेट फटका विमान वाहतुकीला बसला आहे. देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने 28 जानेवारीपर्यंत काही ठराविक आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची आपली उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने तिबिलिसी (जॉर्जिया), अल्माटी (कझाकस्तान), ताश्कंद (उझबेकिस्तान) आणि बाकू (अझरबैजान) या शहरांचा समावेश आहे. इंडिगोने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती दिली की, इराणमधील सध्याच्या परिस्थितीमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून कंपनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

इराणी हवाई हद्द टाळण्यावर भर; तांत्रिक अडचण काय?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही शहरांसाठी जाणारी इंडिगोची विमाने इराणी हवाई हद्दीतून प्रवास करतात. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एअरलाइन आता ही हद्द टाळत आहे. साधारणपणे 6 ते 7 तासांच्या या प्रवासासाठी इंडिगो A320neo विमाने वापरते. मात्र, या विमानांची इंधन क्षमता आणि रेंज पर्यायी लांबच्या मार्गावरून जाण्यासाठी पुरेशी नसल्याने उड्डाणे रद्द करणे हाच पर्याय उरला आहे. यामुळे रविवारी होणारी दिल्ली-तिबिलिसी आणि मुंबई-अल्माटी उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता लष्करी तणाव हे यामागचे मुख्य कारण मानले जात आहे.

हेही वाचा - Antiship Hypersonic Missile: आता खैर नाही; प्रजासत्ताक दिनी DRDO ने जगाला दाखवले भारताचे 'हायपरसोनिक' मिसाइल

प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन आणि स्लॉट कपात

इंडिगोने आपल्या प्रवाशांना विमान प्रवासाची स्थिती (Flight Status) नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हिवाळी उड्डाणांमधील व्यत्ययाचे कारण देत इंडिगोच्या उड्डाणांमध्ये 10 टक्के कपात केली आहे. यामुळे कंपनीने विविध देशांतर्गत विमानतळांवरील 700 हून अधिक स्लॉट रिकामे केले आहेत. कंपनीने प्रवाशांना त्यांच्या सहकार्याबद्दल आणि संयमाबद्दल आभार मानले असून सुरक्षित प्रवासाला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्पाइसजेटचा चेन्नई विमानतळासाठी 'वेदर अलर्ट'

दुसरीकडे, देशांतर्गत विमान कंपनी स्पाइसजेटनेही आपल्या प्रवाशांसाठी धोक्याचा इशारा (Alert) जारी केला आहे. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे विमानांच्या आगमन आणि निर्गमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. चेन्नईहून प्रवास करणाऱ्या किंवा तिथे जाणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचे अपडेट्स तपासावेत, असे आवाहन स्पाइसजेटने केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री