Telegram Banned: जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अॅप्सपैकी एक असलेल्या 'टेलिग्राम'ला एका बलाढ्य देशाने मोठा दणका दिला आहे. या देशातील सरकारने टेलिग्रामवर अधिकृतपणे बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली असून, नागरिकांना सरकारी मालकीच्या प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित होण्यास प्रोत्साहित केले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य की राष्ट्रीय सुरक्षा? या वादामुळे संबंधित अॅप आता त्या देशात इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.
सुरक्षेचे कारण की हेरगिरी?
हा कडक निर्णय घेणारा देश दुसरा कोणी नसून रशिया आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचे प्रमुख कारण 'नागरिकांची सुरक्षा' हे दिले आहे. रशियाची नियामक संस्था 'रोस्कोमनाडझोर'च्या मते, या अॅपवरील लोकांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित नाही. तसेच, गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारा मजकूर काढून टाकण्यास टेलिग्रामने नकार दिला, असा आरोप सरकारने केला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते रशियन सैन्य, सरकारी मीडिया आणि खुद्द क्रेमलिन अधिकारीही हेच अॅप वापरत असल्याने या निर्णयाने विसंगती निर्माण झाली आहे.
'मॅक्स' अॅपच्या सक्तीवर टीका
टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी रशियन सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. दुरोव यांच्या मते, रशिया लोकांना सरकारी अॅप 'मॅक्स' वापरण्यास भाग पाडत आहे, जेणेकरून सरकार लोकांवर सहज हेरगिरी करू शकेल. रशियात विकल्या जाणाऱ्या सर्व स्मार्टफोनवर 'मॅक्स' अॅप प्री-इंस्टॉल करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. दुरोव यांनी या परिस्थितीची तुलना इराणमधील बंदीशी केली असून, कितीही दबाव आला तरी टेलिग्राम गोपनीयतेचे रक्षण करत राहील, असे स्पष्ट केले आहे.
ब्लॉगर्स आणि सैनिकांचा सरकारला विरोध
पुतिन सरकारच्या या निर्णयाचा रशियातच मोठा विरोध होत आहे. विशेषतः युद्धक्षेत्रातून वृत्तांकन करणाऱ्या ब्लॉगर्सनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, टेलिग्रामवर बंदी घालून सरकार शत्रूला मदत करत आहे. रशियन सैनिकांना संदेश पाठवण्यासाठी हे अॅप महत्त्वाचे होते, मात्र आता त्यांना संवादासाठी कबुतरांवर अवलंबून राहावे लागेल, अशी उपरोधिक टीकाही केली जात आहे. प्रतिबंधित मजकूर न हटवल्याबद्दल रशियाने टेलिग्रामला सुमारे 64 दशलक्ष रूबल दंड देखील ठोठावला आहे.
हेही वाचा - Spam Protection : स्पॅम कॉल्सवर आता AI ठेवणार करडी नजर; तक्रारीविनाच संशयास्पद नंबर होणार ब्लॉक
भारतीय वापरकर्त्यांनी काय करावे?
रशियाने टेलिग्रामवर बंदी घातली असली तरी भारत सरकारने अद्याप या अॅपबाबत कोणताही इशारा दिलेला नाही. टेलिग्रामने रशियाचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, जोपर्यंत भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत सूचना येत नाही आणि तुम्हाला या अॅपच्या अटी व शर्ती मान्य असतील, तोपर्यंत तुम्ही टेलिग्राम वापरणे सुरू ठेवू शकता.