पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) शुक्रवारी आपला भव्य जाहीरनामा जाहीर केला आहे. पाटण्यातील हॉटेल मौर्य येथे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. एनडीएने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी 25 महत्त्वपूर्ण आश्वासने दिली असून, त्यामध्ये रोजगारनिर्मिती, महिलांचे सक्षमीकरण, शेती विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी सुधारणा यांचा समावेश आहे.
1 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन
एनडीएने आपल्या जाहीरनाम्यात तरुणांसाठी मोठी घोषणा करत 1 कोटी नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं वचन दिलं आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेगा कौशल्य केंद्र स्थापन करून युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यामुळे बिहारला “ग्लोबल स्किल हब” म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दीदी योजना
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे. ‘मिशन करोडपती’द्वारे ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
सर्वात मागासवर्गीय समाजासाठी विशेष उपक्रम
एनडीएने सर्वात मागासवर्गीय समाजातील व्यावसायिक गटांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करून या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचं मूल्यांकन करण्यात येईल.
शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठी मदत
शेतकऱ्यांना दरवर्षी 3000 रुपयांची थेट मदत, म्हणजेच एकूण 9000 रुपये दिले जातील. कृषी क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पंचायत स्तरावर धान, गहू, मका, डाळी यांसारख्या पिकांची एमएसपीवर खरेदी केली जाईल. तसेच मत्स्यपालकांसाठी जुब्बा साहनी मच्छीमार योजना आणि दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी बिहार दूध अभियान राबविण्यात येईल.
शिक्षणात क्रांती: केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण
गरिब कुटुंबातील मुलांसाठी केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं वचन एनडीएने दिलं आहे. शाळांमध्ये पौष्टिक नाश्ता, मध्यान्ह भोजन आणि आधुनिक कौशल्य प्रयोगशाळा सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाला एआय (Artificial Intelligence) प्रशिक्षण दिलं जाईल, ज्यामुळे बिहारला देशाचं “AI हब” म्हणून स्थान मिळवून देण्यात येईल.
आधुनिक पायाभूत सुविधा आणि उद्योग विकास
बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी 7 एक्सप्रेसवे, 3600 किमी रेल्वे ट्रॅक, तसेच अमृत भारत एक्सप्रेस आणि नमो रॅपिड रेल सेवा सुरू करण्याचा आराखडा आहे. प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक औद्योगिक पार्क आणि कारखाने उभारले जातील. औद्योगिक विकासासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल, ज्यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील.
शहरी विकास आणि ग्रीनफील्ड शहर
एनडीए सरकार नवीन पाटणा येथे ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी उभारणार आहे. प्रमुख शहरांमध्ये उपग्रह टाउनशिप उभारल्या जातील. तसेच सीतापुरम या नावाने जनकपुर-सीतामढी परिसरात जागतिक दर्जाचे आध्यात्मिक शहर विकसित करण्याचा आराखडा आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि मेट्रो सेवा
पाटण्याजवळील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच दरभंगा, पूर्णिया आणि भागलपूर येथेही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. बिहारमधील 10 नवीन शहरांमधून देशांतर्गत उड्डाणे सुरू केली जातील आणि 4 शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्यात येतील.
आरोग्यसेवा आणि वैद्यकीय सुविधा
राज्यात वैद्यकीय शहर (Medical City) बांधले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाणार असून बालरोग, ऑर्थोपेडिक्स आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी केली जाईल. गरिबांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार योजना सुरू केली जाईल.
खेळ, पर्यटन आणि संस्कृतीचा विकास
बिहारमध्ये स्पोर्ट्स सिटी उभारली जाणार आहे. प्रत्येक विभागात निवडलेल्या खेळांसाठी उत्कृष्टता केंद्र तयार केले जाईल. बिहार हेरिटेज कॉरिडॉर, फिल्म सिटी, मिथिला टूर सिटी आणि शारदा सिन्हा कला विद्यापीठ स्थापन करण्याची योजना आहे.
गरिबांसाठी पंचामृत योजना एनडीएने गरिबांसाठी “पंचामृत हमी योजना” जाहीर केली आहे. यात मोफत रेशन, 125 युनिट मोफत वीज, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, 50 लाख पक्की घरे, आणि सामाजिक सुरक्षा पेन्शन देण्यात येणार आहे.
बिहारचा 5 वर्षांत विकासाचा रोडमॅप
एनडीएच्या मते, पुढील पाच वर्षांत बिहारला “पूर ते फॉर्च्यून मॉडेल” अंतर्गत जलसंपदा, शेती आणि मत्स्यपालन क्षेत्रात मोठी झेप घेता येईल. नदी जोडणी, तलाव आणि कालव्यांचे जाळे तयार करून राज्याला समृद्धीच्या मार्गावर नेले जाईल.
हेही वाचा: Nirmala Sitharaman: पावसामुळे निर्मला सीतारामन यांची फ्लाईट डायव्हर्ट; भूतान दौरा स्थगित