बीर बिलिंग: हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध साहसी क्रीडा स्थळ Bir Billing येथे शुक्रवारी सकाळी भीषण पॅराग्लायडिंग अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्याच काही क्षणांत टँडम पॅराग्लायडिंग पायलट कोसळला असून, या दुर्घटनेत पायलटचा जागीच मृत्यू झाला. यावर्षी बीर बिलिंग परिसरात झालेला हा तिसरा प्राणघातक पॅराग्लायडिंग अपघात असल्याने साहसी क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी मृत पायलटची ओळख मोहन सिंग (वय अंदाजे 30), रा. बारोट (बीर बिलिंगपासून सुमारे 30 किमी अंतर) अशी केली आहे. सहकारी पायलट प्रताप सिंग यांच्या माहितीनुसार, मोहन सिंग एका महिला पर्यटकासोबत टँडम फ्लाइट करत होते. अपघातात पायलटचा मृत्यू झाला, मात्र संबंधित महिला पर्यटक गंभीर जखमी न होता बचावली आहे.
या दुर्घटनेनंतर पॅराग्लायडिंग समुदायात तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. मृत पायलटला श्रद्धांजली म्हणून शनिवारी बीर बिलिंगमध्ये ‘नो-फ्लायिंग डे’ पाळण्यात आला. या घटनेमुळे परिसरात आलेल्या पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी पुढील फ्लाइट्सबाबत पुनर्विचार सुरू केला आहे.
हेही वाचा: Transgender Nagarsevak Candidate Death: सोलापूर हादरलं ! तृतीयपंथी नगरसेवकपदाच्या उमेदवाराला संपवलं, धक्कादायक कारण समोर
कांगडा जिल्हाधिकारी हेमराज बैरवा यांनी सांगितले की, अपघाताबाबत वेगवेगळ्या माहिती समोर येत असून, बैजनाथचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. प्रशासनाने पॅराग्लायडिंगसाठी ठरवलेल्या Standard Operating Procedures (SOPs) चे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांनी हेही नमूद केले की, केवळ इंडेम्निटी फॉर्म भरून घेणे पुरेसे नाही. प्रवाशांची फिटनेस तपासणी, वजन मर्यादा, तसेच वैद्यकीय स्थिती यांची योग्य पडताळणी करणे गरजेचे आहे. सुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष झाल्यास अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याचा धोका कायम राहतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक पायलट प्रताप सिंग यांनी सांगितले की, बीर बिलिंग परिसरात सुमारे 400 पॅराग्लायडिंग पायलट्स कार्यरत आहेत. मात्र त्यांचे उत्पन्न अत्यंत अनिश्चित आणि हंगामी स्वरूपाचे आहे. पर्यटन हंगामात एखाद्या पायलटला दिवसाला तीन ते चार फ्लाइट्स मिळतात, तर ऑफ-सीझनमध्ये दोन दिवसांत एखादीच फ्लाइट मिळते. एका फ्लाइटमागे पायलटला साधारण 800 ते 1000 रुपये मिळतात, तर पर्यटकांकडून 2500 ते 3000 रुपये आकारले जातात.
दिल्लीहून आलेले पर्यटकांनी सांगितले की, ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी ते बीर बिलिंगमध्ये आले होते. “आम्ही एक फ्लाइट घेतली होती, पण या अपघातानंतर दुसरी फ्लाइट घ्यावी की नाही, याबाबत आम्ही संभ्रमात आहोत,” असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे साहसी पर्यटन खेळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा: Ravindra Dhangekar: पुणे मनपा निवडणूक; "भाजपचा प्रस्ताव अमान्य" रवींद्र धंगेकरांची बंडाची भाषा; पुण्यात महायुतीत मिठाचा खडा?