Calcutta Stock Exchange: एकेकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)चा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेला कलकत्ता स्टॉक एक्सचेंज (CSE) आता आपल्या 117 वर्षांच्या प्रवासाचा शेवट करत आहे. 1908 मध्ये स्थापन झालेला हा ऐतिहासिक एक्सचेंज 20 ऑक्टोबर 2025 रोजी शेवटची कालीपूजा आणि दिवाळी साजरी करून कायमस्वरूपी बंद होणार आहे.
सेबीची कारवाई
एप्रिल 2013 मध्ये सेबीने (SEBI) नियामक नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून सीएसईमधील ट्रेडिंग स्थगित केले होते. त्यानंतर एक्सचेंजने न्यायालयात लढा दिला, परंतु अखेर स्वेच्छेने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या असाधारण सर्वसाधारण सभेत भागधारकांनी माघार घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, सेबीकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. सीएसईचे अध्यक्ष दीपंकर बोस यांनी सांगितले की, सेबीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर एक्सचेंज होल्डिंग कंपनीमध्ये रूपांतरित होईल. त्यांची उपकंपनी ‘CSE Capital Markets Pvt Ltd’ एनएसई आणि बीएसईचे सदस्य म्हणून ब्रोकरेज सेवा सुरू ठेवेल. म्हणजेच, ट्रेडिंग बंद झालं तरी संस्था पूर्णपणे नाहीशी होणार नाही.
हेही वाचा - Dhanteras 2025 : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची छप्परफाड विक्री, चांदीचाही विक्रम, मात्र भांड्यांचा आकडा ऐकून व्हाल थक्क
मालमत्ता विक्री आणि व्हीआरएस योजना
दरम्यान, सीएसईच्या तीन एकर जमिनीची विक्री श्रीजन ग्रुपला 253 कोटींना करण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी 20.95 कोटींची व्हीआरएस योजना जाहीर करण्यात आली असून, यामुळे दरवर्षी सुमारे 10 कोटींची बचत होणार आहे.
इतिहास आणि वारसा
केतन पारेख घोटाळ्यानंतर 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सीएसईचा पाया कोसळला. अनेक ब्रोकर्सनी सेटलमेंट चुकवल्या आणि गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला. त्या काळात सीएसईत 1,700 पेक्षा जास्त कंपन्या सूचीबद्ध होत्या आणि 650 पेक्षा अधिक ट्रेडिंग सदस्य कार्यरत होते.
हेही वाचा - Nirmala Sitharaman On GST Cut: 'नफेखोरांवर कारवाई करणार'; GST कपातीनंतर निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
सीएसईला भावनिक निरोप
या वर्षीची दिवाळी सीएसईसाठी खास ठरणार आहे. एक्सचेंजचे माजी सदस्य आणि कर्मचारी यंदा शेवटची कालीपूजा आणि दिवाळी साजरी करून सीएसईला निरोप देतील. एकेकाळी कोलकात्याच्या आर्थिक अभिमानाचा केंद्रबिंदू असलेला कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आता इतिहासजमा होणार असून, केवळ त्याचा सुवर्णकाळ आठवणीत उरेल.