Mozilla Firefox Hacking Threat: जर तुम्ही इंटरनेट ब्राउझिंगसाठी Mozilla Firefox वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने फायरफॉक्स ब्राउझर वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी धोक्याचा इशारा दिला आहे. ब्राउझरमधील काही गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे हॅकर्स तुमच्या संगणकात किंवा फोनमध्ये सहज घुसखोरी करू शकतात, असा इशारा या सल्लागारात देण्यात आला आहे.
हॅकर्स तुमच्या डेटावर डल्ला मारू शकतात
CERT-In च्या अहवालानुसार, हॅकर्स रिमोटली (दूरूनच) तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळवू शकतात. यासाठी हॅकर्स वापरकर्त्यांना विशिष्ट वेब लिंक्स किंवा रिक्वेस्ट पाठवतात. एकदा का तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले, की तुमच्या उपकरणाचा ताबा हॅकर्सकडे जाऊ शकतो. यामुळे तुमचे पासवर्ड, बँकिंग तपशील आणि वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. केवळ ब्राउझरच नव्हे, तर 'थंडरबर्ड' या ईमेल क्लायंटमधील त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचे एन्क्रिप्टेड ईमेल्स देखील वाचू शकतात.
तुमचा ब्राउझर 'या' आवृत्तीचा तर नाही ना?
सरकारने स्पष्ट केले आहे की, मोझिला फायरफॉक्स आणि थंडरबर्डच्या जुन्या आवृत्त्या वापरणाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे. खालील आवृत्त्या वापरणाऱ्यांनी तातडीने सतर्क होणे गरजेचे आहे:
Mozilla Firefox: आवृत्ती 147.0.2 पेक्षा जुनी.
Mozilla Thunderbird: आवृत्ती 140.7.1 आणि 147.0.1 पेक्षा जुनी.
या आवृत्त्यांमधील अँटी-ट्रॅकिंग आणि लेआउट स्क्रोलिंग सारख्या तांत्रिक बाबींमधील त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमची पूर्ण सिस्टम क्रॅश करू शकतात.
हेही वाचा - Fake ID Scam : पालकांनो सावधान ! हॅकर्स बनावट ID ने तुमच्या मुलांशी साधतायतं संपर्क; केंद्र सरकारने 'या' घोटाळ्याबाबत दिला मोठा इशारा
स्वतःचा बचाव कसा करावा?
भारत सरकारने सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत:
त्वरित अपडेट करा: तुमच्या फोनमधील प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन ब्राउझर अपडेट करा. PC वापरकर्त्यांनी सेटिंग्जमधील "About Firefox" मध्ये जाऊन नवीनतम आवृत्ती इन्स्टॉल करावी.
अनोळखी लिंक्स टाळा: ई-मेल किंवा मेसेजद्वारे येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
थर्ड पार्टी ॲप्स: अधिकृत स्टोअर व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोतावरून ॲप्स डाउनलोड करणे टाळा. मोझिलाने या सर्व त्रुटी दूर करणारे नवीन अपडेट आधीच जारी केले आहे. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी आपला ब्राउझर लवकरात लवकर अपडेट करणे हाच एकमेव पर्याय आहे.