Congress Leader Imran Masood Controversial Statement : वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना स्वातंत्र्यसैनिक आणि देशासाठी हौतात्म्य स्वीकारलेले भगतसिंग आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांचे काम एकसारखेच असून त्यांच्यात समानता असल्याचे सांगत पुन्हा एकदा संतापजनक विधान केले आहे. "या दोघांचीही आपापल्या मायभूमीसाठी लढण्याचा समान उद्देश आहे," असे सांगत त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानानंतर भाजपने मसूद यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
'हमास' दहशतवादी नाही; भगतसिंग आणि हमासची तुलना
पत्रकार सुशांत सिन्हा यांना दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये इम्रान मसूद भारताच्या परराष्ट्र धोरणावर बोलत होते. "भारताला परराष्ट्र धोरणच नाही. पॅलेस्टाईनवर इस्रायलने हल्ला केला, त्याचा आपण निषेध केला नाही," असे ते म्हणाले. पत्रकार सिन्हा यांनी 'हमास' ही दहशतवादी संघटना असल्याचे निदर्शनास आणताच, मसूद यांनी "भगतसिंग दहशतवादी होते का?" असा उलट प्रश्न केला. तुम्ही भगतसिंग आणि हमास यांची तुलना करत आहात का, या प्रश्नावरही त्यांनी 'हो' असे उत्तर दिले.
'मायभूमीसाठीचा लढा'
मसूद यांनी आपल्या विधानाचे समर्थन करताना म्हटले, "भगतसिंग आपल्या मायभूमीसाठी लढले होते, त्याचप्रमाणे हमासही त्यांच्या मायभूमीसाठी लढत आहे. हमासने आपल्या स्वातंत्र्याचा लढा उभारला आहे." त्यांनी हिंसेचा मार्ग निवडल्याबद्दल वाईट वाटत असल्याचेही यावेळी नमूद केले. हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला करून दीड हजार नागरिकांना मारले आणि शेकडोंना ओलीस ठेवले होते. यावर, हमासने काही शेकडो लोकांना मारले असले तरी, प्रत्युत्तरात इस्रायलने लाखाच्या आसपास लोकांना मारले, हे का पाहिले जात नाही, असा प्रतिप्रश्न मसूद यांनी मुलाखतकाराला केला.
हेही वाचा - Operation Shuterdown Rajasthan: सरकारी योजना लुटणाऱ्या सायबर माफियांवर मोठी कारवाई; 30 आरोपी अटकेत
भाजपाची तीव्र टीका
भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या मुलाखतीचा संबंधित विधानासह एक व्हिडिओ एक्स (X) वर शेअर केला. त्यांनी इम्रान मसूद यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका केली. "डावे आणि काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांचे समर्थन करतात," असे पूनावाला म्हणाले. यापूर्वी कन्हैया कुमारने भगतसिंग यांची तुलना लालू यादव यांच्याशी केली होती आणि काँग्रेसने अनेकदा महापुरूषांचा अवमान केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, मुलाखतकाराने महात्मा गांधींच्या अहिंसावादी मार्गाबद्दल प्रश्न विचारल्यावर इम्रान मसूद यांनी 'आम्ही अहिंसावादी लोक आहोत' असे सांगत तत्काळ सावध पवित्रा घेतला.
यापूर्वी इम्रान मसूद यांनी वक्फ विधेयकावर टीका करताना मी श्रीरामाचा वंशज आहे आणि मला राम मंदिर ट्रस्टमध्ये सहभागी करून घ्या, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी वक्फ विधेयक आणि वक्फ बोर्डामध्ये बिगर मुस्लीम सदस्य असण्याचा विरोध केला होता.
हेही वाचा - Ranjan Pathak Gang: एन्काऊंटर मध्ये ठार झालेला कुख्यात गुंड रंजन पाठक याचे 'सिग्मा अँड कंपनीचे' गुन्हेगारी साम्राज्य उघडकीस; म्हणायचा इतके खून करा की...