तिरुअनंतपुरम: तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता आणि मागील वर्षी राजकारणात प्रवेश केलेले राजकीय नेते थलपती विजय यांच्या रॅलीत झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 39 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या वेदनादायक घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वारंवार घडणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना पाहता, आता राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची वेळ आली आहे, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली.
"गर्दीच्या व्यवस्थापनात काहीतरी गडबड"
तिरुअनंतपुरममध्ये पत्रकारांशी बोलताना शशी थरूर म्हणाले की, करूर येथे घडलेली घटना खूपच दुःखद आणि वेदनादायक आहे. ते म्हणाले, “भारतात गेल्या काही काळापासून वारंवार चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. याचा स्पष्ट अर्थ आहे की, आपल्याकडून गर्दीचे व्यवस्थापन (Crowd Management) करण्यात काहीतरी गडबड होत आहे.” दरवर्षी अशी एखादी तरी घटना घडतेच, याची आठवण करून देताना त्यांनी काही महिन्यांपूर्वी बंगळूरूमध्ये झालेल्या दुर्घटनेचाही उल्लेख केला, ज्यात 11 तरुणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - Thalapathy Vijay Stampede :विजय थलापतींच्या रॅलीत नेमकं काय घडलं? डीजीपींनी केले धक्कादायक खुलासे
कठोर नियमावलीची आवश्यकता
जनतेच्या सुरक्षिततेसाठी आता राष्ट्रीय स्तरावर काही चांगले धोरण आखता येते का, यावर विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे थरूर म्हणाले. ते म्हणाले की, अभिनेता किंवा राजकीय पुढारी यांना ऐकायला किंवा क्रिकेटपटूंना बघायला जेव्हा लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात, तेव्हा काही नियम, कायदे आणि मानके पाळायलाच हवीत. “मी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना आवाहन करतो की, मोठ्या प्रमाणात एकत्र येणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी अत्यंत कठोर अशी नियमावली तयार करावी. जेणेकरून भयानक चेंगराचेंगरीत कुणीही आपले प्रियजन गमावणार नाही,” असे आवाहन त्यांनी केले.
करूर रॅलीतील दुर्घटना
करूर जिल्ह्यात शनिवारी (27 सप्टेंबर) थलपती विजयच्या पक्षाने 'वेलिचम वेलीयेरू' (प्रकाश उजळू द्या) या नावाने प्रचार रॅली काढली होती. जिल्हा प्रशासनाने या रॅलीसाठी केवळ 10,000 लोकांना परवानगी दिली होती आणि 500 पोलीस तैनात केले होते. मात्र, सायंकाळपर्यंत सुमारे 27,000 ते 30,000 लोक घटनास्थळी जमा झाले, ज्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि ही भीषण चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती शासकीय यंत्रणांनी दिली आहे.
हेही वाचा - Karur Stampede: करूरमधील चेंगराचेंगरीमागे कट...; अभिनेता विजयने घेतली उच्च न्यायालयात धाव