नवी दिल्ली: दिल्लीमध्ये वायू प्रदूषण पुन्हा धोक्याची घंटा वाजवत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, आनंद विहार येथे आज सकाळी वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 412 वर पोहोचला. ही पातळी ‘गंभीर’ श्रेणीत मोडत असून श्वसनासंबंधी समस्या, डोळे-नाक जळजळ, दमा आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी विशेषतः धोकादायक आहे.
दिवाळीनंतरपासून हवा अत्यंत खराब श्रेणीत होती. शुक्रवारी वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे थोडा आराम मिळाला आणि राजधानीतील एकूण AQI 284 नोंदला गेला. हा स्तर ‘खराब’ श्रेणीत असला तरी तो नागरिकांच्या आरोग्यासाठी अजूनही अपायकारक आहे. तज्ज्ञांच्या मते हा सुधार तात्पुरता असून काही दिवसांत पुन्हा प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.
एनसीआरमधील इतर शहरांची परिस्थितीही चांगली नाही. गाझियाबादमध्ये AQI (Air Quality Index) 269 नोंदवण्यात आला, तर नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथे अनुक्रमे 246 आणि 262 इतकी नोंद झाली. या भागांमध्ये PM 2.5 आणि PM 10 कणांचे प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात असून धुरकट वातावरण कायम आहे.
हेही वाचा: Election Commission On AI Misuse Ban: प्रचार करताना परवानगी न घेता AI चा वापर करणे पडेल महागात... निवडणूक आयोगाचे कठोर कारवाईचे आदेश
ग्रेटर नोएडामध्ये हवामानाची साथ नसल्याने प्रदूषण हवेतच अडकलं आहे. शुक्रवारी वाऱ्याचा वेग सरासरी 5.6 किमी प्रतितास इतकाच नोंदला गेला, तर आर्द्रता 39 टक्के आणि जास्तीत जास्त तापमान 31 डिग्री सेल्सियस होते. वाऱ्याचा वेग कमी असल्याने धूळ व धूर सहज नष्ट न होता शहरभर पसरलेले दिसत आहेत.
प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा (GRAP) दुसरा टप्पा आधीच लागू आहे. बांधकाम स्थळांवर लक्ष, धुळीवर नियंत्रण आणि वाहन धूर तपासणी यांसारख्या उपाययोजना सुरू आहेत. तरीही, ऑरेंज झोनमधील AQI पातळी आरोग्यास गंभीर परिणाम करणारी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की, दिल्ली सरकारकडून कृत्रिम पावसाची अंमलबजावणी केल्यास एनसीआरमधील वायु गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते. मात्र, नागरिकांनीही स्वतः खबरदारी घेणे आवश्यक असून मास्कचा वापर, बाहेर कमी वेळ घालवणे आणि हवा शुद्ध करणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब करणे याची शिफारस करण्यात आली आहे.
हेही वाचा: CM Fadnavis On Bangladeshi Immigrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांवर लगाम; फडणवीस सरकारची मोठी कारवाई