Friday, March 13, 2026 08:11:30 AM

Lawrence Bishnoi Lawyer: दिल्लीत काश्मीरी गेट परिसरात गोळीबार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकिलाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या

या घटनेत एक जण जखमी झाला असून दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

lawrence bishnoi lawyer दिल्लीत काश्मीरी गेट परिसरात गोळीबार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकिलाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या

दिल्लीतील कश्मीरी गेट परिसरातून धक्कादायक गोळीबाराची घटना समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या वकिलाच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजता पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाली. घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कारच्या मागील काचेचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, कश्मीरी गेट परिसरात पाच जण प्रवास करत असलेल्या कारवर हा हल्ला करण्यात आला. गोळीबारात एका व्यक्तीला दुखापत झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये प्रवास करणाऱ्यांपैकी एक व्यक्ती लॉरेन्स बिश्नोईच्या कायदेशीर टीमशी संबंधित वकील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा: Bank Holiday In March 2026: बँकेची कामे वेळेत उरका! मार्चमध्ये 'इतके' दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

लॉरेन्स बिश्नोईचे वकील दीपक खत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कश्मीरी गेटमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. “आम्ही पाच जण कारमध्ये होतो. देवाच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, कारच्या मधोमध बसलेला संदीप नावाचा व्यक्ती जखमी झाला असून त्याच्या कंबरेला गोळी लागली आहे.

दीपक खत्री यांनी पुढे सांगितले की हल्लेखोर स्कूटीवर आले होते आणि त्यावर तीन जण स्वार होते. संशयितांनी कारचा पाठलाग केल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मंदिरातून घरी परतत असताना कारच्या मागील बाजूने गोळीबार करण्यात आला. त्या वेळी सर्वजण सुजुकी सियाज कारमध्ये प्रवास करत होते. परिस्थिती गंभीर होताच चालकाने वाहन वेगाने पुढे नेल्याने मोठी हानी टळल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्यामागे नेमके कोण आहे किंवा गोळीबार का करण्यात आला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने किंवा व्यक्तीने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दिल्ली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे राजधानीत सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash Update: दादांच्या निधनानंतर मोठा निर्णय! संबंधित विमान कंपनीवर सरकारची थेट कारवाई; आदेश देत म्हटलं की...


सम्बन्धित सामग्री