Tuesday, November 18, 2025 03:22:12 AM

Delhi Pollution: दिवाळीपूर्वी दिल्ली-NCRची हवा विषारी; अनेक भागांत AQI 400 च्या पुढे

वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यास त्रास आणि घशात कोरडेपणा अशी लक्षणे वाढली आहेत.

delhi pollution दिवाळीपूर्वी दिल्ली-ncrची हवा विषारी अनेक भागांत aqi 400 च्या पुढे

Delhi Pollution: दिवाळीपूर्वी राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. हवेत धूर आणि धुळीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यास त्रास आणि घशात कोरडेपणा अशी लक्षणे वाढली आहेत. दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग चौथ्या दिवशी घसरत असून, अनेक भागात AQI ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) माहितीनुसार, दिल्लीचा सरासरी AQI आज सकाळी 274 होता, जो ‘खराब’ श्रेणीत मोडतो. मात्र, काही भागांमध्ये परिस्थिती अत्यंत भीषण आहे. अक्षरधाम परिसरातील AQI 426 नोंदवला गेला असून तो ‘गंभीर’ श्रेणीत येतो. बारापुल्ला भागात AQI 290, तर आनंद विहारमध्ये 404 इतका उच्च स्तर नोंदवला गेला आहे. सकाळी दिल्लीवर धुरक्याचे दाट थर पसरले असून दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

हेही वाचा - China - India Relations: ट्रम्प यांची चिंता वाढली, चीनची भारतासोबत जवळीक, घेतला महत्वपूर्ण निर्णय

दिल्लीला लागून असलेल्या उपनगरांमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. नोएडामध्ये AQI 312, गुरुग्राममध्ये 329, तर गाझियाबादमध्येही हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत आहे. दिल्लीतील काही इतर भागांमध्येही प्रदूषणाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर आहे. सिरी फोर्टमध्ये AQI 317, आर.के. पुरममध्ये 322, नेहरू नगरमध्ये 310, द्वारका सेक्टर 8 मध्ये 327, अशोक विहारमध्ये 304, जहांगीरपुरीमध्ये 314, विवेक विहारमध्ये 349, वजीरपूरमध्ये 361, आणि बवानामध्ये 303 इतका नोंदवला गेला आहे.

हेही वाचा - Divorce Law India: घटस्फोटानंतर 'या' महिलांना मिळणार नाही पोटगी! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

तज्ज्ञांच्या मते, कमी वारे, बांधकामातील धूळ, वाहनांचा धूर आणि पराली जाळण्याच्या घटनांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमान घटल्याने आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे या प्रदूषणात भर पडण्याची भीती असल्याने प्रशासनाने नागरिकांना फटाके फोडणे टाळण्याचे आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


सम्बन्धित सामग्री