दिल्ली-एनसीआरमध्ये 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पावसाने आणि सुमारे 19 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात अचानक बदल झाला. निरोप घेत असलेली थंडी पुन्हा परतल्याची जाणीव नागरिकांना झाली. दिवसभर रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यांमुळे तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली. भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच पावसाचा अंदाज व ‘यलो अलर्ट’ जारी केला होता.
गेल्या आठवड्यात तेज उन्हामुळे उकाड्याची चाहूल लागत होती, मात्र 18 फेब्रुवारीला हवामानाने अचानक करवट घेतली. थंड वाऱ्यांसह हलक्या सरींनी दिवस-रात्र गारठा वाढवला. बुधवारी कमाल तापमान 21.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यापेक्षा 3.3 अंशांनी कमी होते. रिज वेधशाळेत 20.2 अंश, तर आयानगर येथे 19.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा: PM Narendra Modi : AI शिखर परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित; जगातील दिग्गज नेत्यांसह वरिष्ठ तंत्रज्ञान अधिकाऱ्याचा परिषदेत सहभाग
हवामान विभागाने ढगाळ वातावरण, हलका पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता व्यक्त करत ‘यलो अलर्ट’ दिला होता. या अलर्टचा अर्थ दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो असा होतो. मात्र गुरुवारी पावसाचा अंदाज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नसून 19 आणि 20 फेब्रुवारीला अधूनमधून ढगाळ वातावरण राहू शकते. 19 फेब्रुवारीला सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता असून कमाल तापमान 26 ते 28 अंश, तर किमान तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
दरम्यान, 22 फेब्रुवारीपासून पुन्हा उष्णतेची चाहूल लागण्याची शक्यता आहे. 22 ते 24 फेब्रुवारीदरम्यान आकाश स्वच्छ राहून तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर रात्रीचे तापमान 16 अंशांपर्यंत वाढू शकते. स्कायमेट वेदरच्या वरिष्ठ तज्ज्ञांच्या मते, राजस्थान, पंजाब आणि हरियाणातून सुरू झालेली पावसाची प्रणाली दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशपर्यंत सक्रिय होती; मात्र आता हळूहळू परिस्थिती स्थिर होईल.
वायूगुणवत्तेबाबतही काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, इंडिया गेट आणि कर्तव्य पथ परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 152 नोंदवला गेला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत आहे. सकाळी परिसरात ढगाळ वातावरण आणि हलकी थंड हवा जाणवत होती. पावसामुळे प्रदूषणात तात्पुरती घट झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026: ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने सह्याद्री दुमदुमली; शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार सोहळा, राज्यभरात जल्लोष