Saturday, March 07, 2026 05:09:33 AM

UPI in Malaysia: डिजिटल इंडियाचा परदेशात डंका! आता मलेशियातही चालणार UPI; भारत आणि मलेशियामध्ये ऐतिहासिक पेमेंट करार

एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) आणि मलेशियाचे राष्ट्रीय पेमेंट नेटवर्क 'पेनेट' (PayNet) यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.

upi in malaysia डिजिटल इंडियाचा परदेशात डंका आता मलेशियातही चालणार upi भारत आणि मलेशियामध्ये ऐतिहासिक पेमेंट करार

UPI in Malaysia: भारतात अत्यंत लोकप्रिय असलेली UPI (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) पेमेंट पद्धत आता सातासमुद्रापार आपली ओळख निर्माण करत आहे. भारतीय पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या मलेशियामध्ये आता भारतीय प्रवाशांना रोख रकमेची चिंता करण्याची गरज उरणार नाही. एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) आणि मलेशियाचे राष्ट्रीय पेमेंट नेटवर्क 'पेनेट' (PayNet) यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या भागीदारीमुळे भारतीय प्रवाशांना मलेशियात त्यांच्या मोबाईलमधील UPI अॅपद्वारे थेट पेमेंट करणे शक्य होणार आहे.

कशी असेल पेमेंट प्रक्रिया?
हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, मलेशियाला जाणारे भारतीय पर्यटक तिथल्या दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये किंवा पर्यटन स्थळांवर 'DuitNow' (मलेशियाची राष्ट्रीय QR प्रणाली) QR कोड स्कॅन करून आपल्या UPI अॅपद्वारे पेमेंट करू शकतील. दुसऱ्या टप्प्यात, मलेशियातील नागरिक भारतात आल्यावर त्यांच्या स्थानिक 'DuitNow' अॅपचा वापर करून भारतातील UPI QR कोड स्कॅन करून व्यवहार करू शकतील. यामुळे दोन्ही देशांतील पर्यटकांना चलन बदलण्याच्या कटकटीतून मुक्ती मिळणार असून पारदर्शक आणि वेगवान व्यवहार होतील.

लाखो व्यापाऱ्यांना होणार फायदा
मलेशियातील लाखो छोटे-मोठे व्यापारी, रेस्टॉरंट्स आणि मॉलमध्ये DuitNow QR स्वीकारला जातो. त्याचप्रमाणे, भारतातील लाखो व्यापारी UPI वापरतात. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील. विशेषतः मलेशिया सरकारने जाहीर केलेल्या 'व्हिजिट मलेशिया 2026' या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हा करार अत्यंत धोरणात्मक मानला जात आहे. यामुळे भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - UTS App : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 1 मार्चपासून 'UTS' अ‍ॅप कायमचे बंद, आता 'या' अ‍ॅपवर मिळतील सर्व सेवा

जागतिक स्तरावर UPI चा विस्तार
NIPL चे सीईओ रितेश शुक्ला आणि पेनेटचे सीईओ प्रवीण राजन यांनी या भागीदारीचे स्वागत केले आहे. जागतिक स्तरावर एक इंटरऑपरेबल पेमेंट सिस्टम तयार करणे, हे NPCI चे मुख्य ध्येय आहे. मलेशियाच्या समावेशामुळे आता सिंगापूर, यूएई, फ्रान्स, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मॉरिशस यांसारख्या देशांच्या यादीत आणखी एका महत्त्वाच्या देशाची भर पडली आहे. डिजिटल इंडियाला जागतिक स्तरावर मिळत असलेली ही मान्यता भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अभिमानास्पद मानली जात आहे. 
 


सम्बन्धित सामग्री