आजच्या वेगवान डिजिटल जीवनशैलीत स्मार्टफोनशिवाय दिवसाची कल्पनाही करणे कठीण झाले आहे. मात्र, हातातील हाच स्मार्टफोन गाडी चालवताना जीवघेणा ठरू शकतो, हे अनेकदा दुर्लक्षित राहते. क्षणभरासाठी आलेला कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज किंवा सोशल मीडिया नोटिफिकेशन ड्रायव्हरचे लक्ष रस्त्यावरून हटवते आणि अपघाताला निमंत्रण देते. आश्चर्याची बाब म्हणजे, मोबाईलमधील एक साधा डू नॉट डिस्टर्ब (Do Not Disturb, DND) मोड हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
रस्ता सुरक्षेवर काम करणाऱ्या AAA Foundation for Traffic Safety या संस्थेच्या अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोठ्या संख्येने वाहनचालकांना DND मोड कसा सुरू करायचा हेच माहिती नसल्याचे आढळले. तज्ज्ञ जेक नेल्सन यांच्या मते, ड्रायव्हिंगदरम्यान स्मार्टफोन हा अपघाताचा प्रमुख घटक बनत असला तरी योग्य सेटिंग वापरल्यास तोच फोन सुरक्षिततेचा साथीदार ठरू शकतो. विशेष म्हणजे हा फीचर Android आणि iOS या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सहज उपलब्ध आहे.
या अभ्यासात 300 परवानाधारक चालकांचा सहभाग होता. काही चालक आधीपासून DND वापरत होते, काहींनी कधीच वापरला नव्हता, तर काहींनी तो वापरणे बंद केले होते. निवडक 26 चालकांवर तब्बल 10 आठवडे निरीक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात त्यांनी नेहमीप्रमाणे वाहन चालवले, तर पुढील टप्प्यात ड्रायव्हिंगदरम्यान DND मोड अनिवार्य करण्यात आला आणि इथेच परिणामांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.
हेही वाचा: Iran Israel Conflict: चार दशकांच्या सत्तेला पूर्णविराम? सर्वोच्च नेते अली खामेनी ठार; वारसदार मोज्तबाचाही मृत्यू, इराणमध्ये सत्तासंकट गडद
DND मोड सुरू असताना वाहन चालवताना मोबाईलशी छेडछाड करण्याचे प्रमाण तब्बल 41 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले. इतकेच नव्हे, तर गाडी चालवताना फोन हातात घेण्याची सवयही लक्षणीयरीत्या घटली. दरवर्षी हजारो अपघात केवळ मोबाईलमुळे लक्ष विचलित झाल्याने होतात, हे लक्षात घेतल्यास हा छोटासा फीचर किती महत्त्वाचा आहे, याची कल्पना येते.
DND मोड सुरू केल्यावर फोन पूर्णपणे बंद होत नाही, तर तो सायलेंट स्थितीत जातो. कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन येत राहतात मात्र रिंग किंवा व्हायब्रेशन होत नसल्याने ड्रायव्हरचे लक्ष विचलित होत नाही. गरज असल्यास काही महत्त्वाच्या संपर्कांना परवानगी देण्याची सुविधाही उपलब्ध असते. फक्त फोनच्या सेटिंग्ज किंवा कंट्रोल सेंटरमधून हा पर्याय काही सेकंदांत सुरू करता येतो.
ड्रायव्हिंगपुरतेच नव्हे, तर अभ्यास, ऑफिसचे काम किंवा महत्त्वाच्या बैठकीदरम्यानही DND मोड एकाग्रता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवले तर ते सुरक्षितता वाढवते; पण निष्काळजी वापर धोकादायक ठरतो. लक्षात ठेवा एक लहान सेटिंग, पण मोठी सुरक्षा! थोडी जागरूकता आणि सवयीतील छोटासा बदल रस्त्यावर अनेक जीव वाचवू शकतो.
हेही वाचा: Maharashtra Local Body Election 2026: का रेंगाळल्या 19 जिल्हा परिषदांच्या निवडणुका? जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय