EC's Reply to Rahul Gandhi Allegations : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (5 नोव्हेंबर) नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन हरियाणातील विधानसभा निवडणुकीत 'मतचोरी' झाल्याचा नवा आणि गंभीर आरोप केला. त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमताने 25 लाख मतांची चोरी केल्याचा थेट दावा केला. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी कथित पुरावे देखील सादर केले.
राहुल गांधींचे गंभीर आरोप
राहुल गांधींनी मतदार याद्यांमधील अनेक विसंगती निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी एकाच मतदाराच्या वेगवेगळ्या नावांसह नोंदी, अनेक मतदारांच्या नावापुढे सारखाच पत्ता आणि त्यांच्या वयांमधला गोंधळ असे अनेक प्रकार दाखवले.
'ब्राझिलियन मॉडेल'चा मुद्दा: राहुल गांधी यांनी एका ब्राझिलियन तरुणीचा फोटो दाखवला आणि विचारले की "निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?" ही मॉडेल ब्राझीलची असूनही ती हरियाणाच्या मतदार यादीत आहे.
मतदानाची संख्या: राहुल गांधींनी दावा केला की, "ब्राझीलच्या या महिलेने 10 बूथवर 22 वेळा मतदान केले आहे." यावरून ही एक 'खास मोडस ऑपरेंडी' (Modus Operandi) आहे आणि केंद्राकडून हे नाव टाकण्यात आले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
मतचोरीचा आकडा: राहुल गांधींच्या दाव्यानुसार, अशाच पद्धतीने तब्बल 25 लाख मतांची चोरी करण्यात आली आहे. "दर आठ पैकी एक मत बोगस आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगाचे 15 मुद्द्यांमध्ये प्रत्युत्तर
राहुल गांधी यांच्या या अत्यंत गंभीर आरोपांवर हरियाणा राज्य निवडणूक आयोगाने (Haryana State Election Commission) तातडीने उत्तर दिले आहे. आयोगाने 15 मुद्दे मांडत 'एक्स' प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केला आहे की, "मतदार याद्यांची पडताळणी झाली, तेव्हा काँग्रेससह विविध पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्सनी (BLAs) त्यावर आक्षेप का घेतले नाहीत?" आयोगाने आपल्या पोस्टमध्ये मतदारांची नावे आणि तपशील सत्यापित करण्याची आणि यादीतील त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया काय आहे, यावर जोर दिला आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदार याद्या तयार करताना सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाते आणि त्यांच्या हरकती आणि सूचना लक्षात घेऊन दुरुस्ती केली जाते. आता थेट मतदारांच्या संख्येवर आक्षेप घेण्यापूर्वी पक्षांनी योग्य प्रक्रियेचे पालन करणे अपेक्षित होते.
हेही वाचा - Rahul Gandhi : "हरियाणात आहेत तब्बल 25 लाख बनावट मतदार" राहुल गांधींचा धक्कादायक दावा
निवडणूक आयोगाने मांडले 15 मुद्दे
- 2 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व राजकीय पक्बरोबर शेअर केली.
- एसएसआर दरम्यान प्राप्त झालेल्या दाव्यांची आणि हरकतींची एकूण संख्या 4,16,408 इतकी होती.
- बीएलओंची (बूथ लेव्हल ऑफिसर्स) एकूण संख्या : 20,629
- 27 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांबरोबर शेअर करण्यात आली.
- जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे ईआरओ विरुद्ध दाखल केलेल्या अपिलांची संख्या : शून्य
- जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्ध सीईओंकडे दाखल केलेल्या दुसऱ्या अपिलांची संख्या : शून्य
- अंतिम मतदार यादी 16 सप्टेंबर 2024 रोजी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांबरोबर शेअर करण्यात आली.
- मतदान केंद्रांची एकूण संख्या : 20,632.
- निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या : 1,031
- सर्व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान एजंटांची एकूण संख्या : 86,790.
- मतदानानंतरच्या दिवशी पडताळणीदरम्यान उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची संख्या : शून्य
- मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी एजंटांची संख्या: 10,180
- मतमोजणी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या तक्रारी/आक्षेप : पाच
- 8 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर.
- निवडणुकीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकांची संख्या : 23
हेही वाचा - Modi - Trump Talk: "ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींचा मोठा आदर..." व्हाईट हाऊसने दिली मोदी - ट्रम्प संबंधाबद्दल ही माहिती