Wednesday, February 18, 2026 05:26:14 PM

Yuvraj Mehta Case: दोन तास तो मृत्यूच्या दारात पण वाचवण्याऐवजी व्हिडीओ करण्यात मग्न, वडिलांचा संताप, म्हणाले, 'मदत मिळाली असती तर...'

एका बाजूला युवराज मदतीसाठी गयावया करत होता, तर दुसऱ्या बाजूला बघ्यांची गर्दी त्याचे व्हिडिओ काढण्यात मग्न होती. अखेर या तरुणाने जगाचा निरोप घेतला.

yuvraj mehta case दोन तास तो मृत्यूच्या दारात पण वाचवण्याऐवजी व्हिडीओ करण्यात मग्न वडिलांचा संताप म्हणाले मदत मिळाली असती तर

Yuvraj Mehta Case:  'बाबा मला वाचवा, प्लीज कुणाला तरी मदतीला पाठवा...' हे शब्द होते 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहताचे, जो 20 फूट खोल पाण्याच्या खड्ड्यात बुडणाऱ्या कारच्या टपावर उभा राहून दोन तास मृत्यूशी झुंज देत होता. एका बाजूला युवराज मदतीसाठी गयावया करत होता, तर दुसऱ्या बाजूला बघ्यांची गर्दी त्याचे व्हिडिओ काढण्यात मग्न होती. अखेर या तरुणाने जगाचा निरोप घेतला आणि मागे उरला तो समाजाच्या सुन्न करणाऱ्या मानसिकतेचा प्रश्न.

दोन तास 'लाईव्ह' मृत्यूचा थरार

ग्रेटर नोएडातील सेक्टर 150 मध्ये हा भीषण अपघात घडला. गुरुग्रामहून काम संपवून घरी परतत असताना, धुक्यामुळे युवराजची कार थेट एका निर्माणाधीन इमारतीच्या खोल खड्ड्यात कोसळली. युवराजने रात्री 12 वाजता आपल्या वडिलांना फोन केला. तो कारच्या छतावर उभा होता आणि मोबाईलच्या टॉर्चने सिग्नल देत 'Help' म्हणून ओरडत होता.  युवराजचे वडील राजकुमार मेहता यांनी आरोप केला की, "तिथे अनेक लोक उपस्थित होते, पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. लोक फक्त मोबाईलवर व्हिडिओ बनवत होते. जर वेळेवर दोरी किंवा बोट मिळाली असती, तर माझा मुलगा आज जिवंत असता."

हेही वाचा - Stray Dogs: आता भटक्या कुत्र्यांनाही बसवणार मायक्रोचिप्स; 35 कोटींच्या योजनेमागचं नेमकं गुपित काय?

प्रशासनाचा भोंगळ कारभार?

अपघात झाला तेव्हा मदतीसाठी आलेल्या यंत्रणांकडे आवश्यक साधनेच नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. "तिथे ना कोणते गोताखोर (Divers) होते, ना कोणती बोट. 2:30 वाजेपर्यंत मुलाचा फोन सुरू होता, पण यंत्रणा हतबल दिसली," असे राजकुमार मेहता यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले.

बळी गेल्यानंतर जाग आली 

या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कॅन्डल मार्च काढून प्रशासनाचा निषेध केला. रहिवाशांनी वारंवार मागणी करूनही तिथे बॅरिकेड्स किंवा रिफ्लेक्टर्स लावले नव्हते. युवराजचा बळी गेल्यानंतर आता नोएडा प्राधिकरणाने तिथे बॅरिकेड्स बसवले आहेत. या प्रकरणी दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Mumbai Crime : अंधेरीत सोसायटीवर अंदाधुंद गोळीबार; आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल

पोलिसांचे स्पष्टीकरण

पोलिसांनी मात्र हलगर्जीपणाचे आरोप फेटाळले आहेत. "त्या रात्री धुक्यामुळे दृश्यमानता शून्य होती. अग्निशमन दल आणि NDRF च्या पथकाने क्रेन आणि तात्पुरत्या बोटीच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबवली," असे पोलिसांनी म्हटले आहे. शनिवारी सकाळी युवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
 


सम्बन्धित सामग्री