JioFrames AI Glasses: 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' (India AI Impact Summit 2026) चा शानदार प्रारंभ झाला असून, जिओने आपल्या पॅव्हेलियनमध्ये जिओफ्रेम्स (JioFrames) या प्रगत एआय चष्म्यांचे अनावरण केले आहे. हे चष्मे केवळ स्टाईलिश नसून व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून ते रिअल-टाइम भाषांतरापर्यंत अनेक कामे चुटकीसरशी करू शकतात. विशेष म्हणजे, बाजारात उपलब्ध असलेल्या रे-बॅन मेटा (Ray-Ban Meta) चष्म्यांच्या तुलनेत जिओचे हे एआय चष्मे 50 टक्के कमी किमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कॅमेरा, स्पीकर आणि हाय-टेक फीचर्स
जिओफ्रेम्समध्ये दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्याद्वारे वापरकर्ते सहजपणे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. यामध्ये इन-बिल्ट स्पीकर्स आणि मायक्रोफोन देखील आहेत, ज्यामुळे गाणी ऐकण्यासाठी किंवा कॉलवर बोलण्यासाठी इअरबड्सची गरज भासणार नाही. हे चष्मे वजनाला अत्यंत हलके आणि घालण्यासाठी आरामदायी आहेत. तसेच, ज्यांना आधीच दृष्टीचा चष्मा आहे, ते त्यांच्या चष्म्याच्या फ्रेमला हे एआय डिव्हाईस सहज जोडू शकतात.
"Hey Jio" म्हणताच मिळेल मदत
जिओच्या या चष्म्यांमध्ये स्वतःची स्वतंत्र एआय प्रणाली आहे. वापरकर्ते "Hey Jio" असे म्हणून या चष्म्यांशी संवाद साधू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादी रेसिपी किंवा माहिती हवी असेल, तर एआय ती माहिती शोधून थेट चष्म्यातील स्पीकरद्वारे तुम्हाला ऐकवेल. महत्त्वाचे म्हणजे, हे चष्मे अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करतात, ज्यामुळे एका भाषेतील संवाद दुसऱ्या भाषेत त्वरित भाषांतरित (Translation) करणे सोपे होणार आहे.
हेही वाचा - Electric Cars 2026 : पेट्रोल-डिझेलचं टेन्शन सोडा! 2026 मध्ये भारतीय रस्त्यांवर 'या' 5 इलेक्ट्रिक कार्स करणार 'राज'; एका चार्जिंगमध्ये 543 किमी मायलेजसह हे फिचर्स
पंतप्रधानांच्या हस्ते 'एआय एक्स्पो'चे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 'इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो'चे उद्घाटन केले. या परिषदेत 600 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी झाले असून विविध नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत. पंतप्रधान मोदींनी 'X' (ट्विटर) वर या इव्हेंटचे कौतुक करताना म्हटले की, "हा एक्स्पो कल्पना, नवोपक्रम आणि हेतूंचा एक शक्तिशाली संगम आहे." हा शिखर सोहळा 20 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून, आगामी काळात जिओचे हे एआय चष्मे भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच होतील.