Friday, June 12, 2026 10:39:13 PM

Crime News: तोंडात बोळा, हात-पाय दोरीने बांधलेले..., भरवस्तीत महिलेला संपवलं; मृतदेहाची ती अवस्था पाहून पोलिसही चक्रावले

महिलेचा मृतदेह संशयास्पद आणि भयावह स्थितीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

crime news तोंडात बोळा हात-पाय दोरीने बांधलेले भरवस्तीत महिलेला संपवलं मृतदेहाची ती अवस्था पाहून पोलिसही चक्रावले

Crime News: मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नैगाढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुती सेंगरान गावात एका 45 वर्षीय महिलेला तिच्याच राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं. महिलेचा मृतदेह संशयास्पद आणि भयावह स्थितीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

घरात एकट्याच राहत होती महिला
मृत महिलेची ओळख उमा सिंग (45) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमा सिंग 2 मे रोजीच बहुती गावातील आपल्या जुन्या घरात राहण्यासाठी आल्या होत्या. त्या तिथे एकट्याच वास्तव्यास होत्या. शुक्रवारी सकाळी बराच वेळ झाला तरी घराचा दरवाजा उघडला नाही आणि कोणतीही हालचाल दिसली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता उमा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

तोंडात बोळा कोंबल्याने गुदमरला श्वास
घटनेची भीषणता मृतदेहाच्या अवस्थेवरून स्पष्ट होत आहे. आरोपींनी उमा यांचे दोन्ही हात आणि पाय दोरीने पाठीमागे घट्ट बांधले होते. ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता आणि चेहरा व नाकही कापडाने आवळले होते. प्राथमिक अंदाजानुसार, आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केला असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Pune Crime: 'शिक्षणाचे माहेरघर' अशी ओळख असणाऱ्या पुण्यात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटना अधिक, अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी

पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगवान
घटनेची माहिती मिळताच नैगाढी पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDOP) आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (FSL) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून ठसेतज्ज्ञांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तपासात समोर आले आहे की, उमा सिंग यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न केले होते. पोलीस सध्या जुने वैमनस्य, कौटुंबिक कलह किंवा मालमत्तेचा वाद या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून हत्येचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र, या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री