टी20 वर्ल्डकप 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गतविजेता म्हणून भारताकडे यंदाही मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. मात्र या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चर्चेत आले आहेत. तेही मैदानावरील नव्हे, तर मैदानाबाहेरील कारणांमुळे. सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे गंभीर नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला असून, त्याच मुद्द्यावरून आता त्याला माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
गौतम गंभीर हा स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. खेळाडू असताना मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याने नेहमीच ठाम भूमिका मांडली. प्रशिक्षक म्हणूनही तो अनेकदा टीकाकारांना सोशल मीडियावर थेट उत्तर देताना दिसतो. अलीकडेच एका राजकीय नेत्यासोबतचा फोटो आणि त्यावरील भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. यामुळे पुन्हा एकदा गंभीरच्या सोशल मीडिया उपस्थितीवर चर्चा सुरू झाली.
याच पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणेने गौतम गंभीरला थेट आणि प्रामाणिक सल्ला दिला आहे. एका मुलाखतीत रहाणे म्हणाला की, टी20 वर्ल्डकप संपेपर्यंत गंभीरने सोशल मीडियापासून थोडं अंतर ठेवावं. लोक काय बोलत आहेत, कोण काय टीका करत आहे, याकडे लक्ष न देता संघ आणि खेळाडूंवर संपूर्ण फोकस ठेवणं गरजेचं आहे. रहाणेने स्वतःच्या अनुभवातून सांगितलं की, तो खेळाडू असताना अशाच प्रकारे सोशल मीडियापासून दूर राहत असे, ज्यामुळे त्याला मानसिक शांतता आणि खेळावर लक्ष केंद्रित करता आलं.
गंभीर सध्या टीकाकारांच्या रडारवर आहे. विशेषतः न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. काही टीका वैयक्तिक पातळीवरही गेल्या, ज्यामुळे गंभीरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. मात्र याच दरम्यान त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका जिंकत संघाने आत्मविश्वास दाखवून दिला आहे.
टी20 वर्ल्डकप 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत असून भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या स्पर्धेत भारत पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातो. गंभीरसाठीही ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. जर भारताने हा वर्ल्डकप जिंकला, तर दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो पहिला भारतीय मुख्य प्रशिक्षक ठरू शकतो.
अशा निर्णायक क्षणी अजिंक्य रहाणेचा सल्ला केवळ व्यक्तीगत नाही, तर संघाच्या हिताचा मानला जात आहे. सोशल मीडियापेक्षा मैदानावरील रणनीती, खेळाडूंची मानसिक तयारी आणि संघातील एकजूट यावर लक्ष केंद्रीत करणं हेच यशाचं गमक ठरू शकतं. आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की, गंभीर हा सल्ला कितपत गांभीर्याने घेतो आणि त्याचा परिणाम टी20 वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीवर कसा दिसून येतो.