नवी दिल्ली: सध्या जग एका अघोषित युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन संघर्ष असो वा इराण-अमेरिका यांच्यातील वाढता तणाव, जागतिक शांतता धोक्यात आली असतानाच 'ग्लोबल फायरपॉवर'ने 2026 ची लष्करी ताकद दर्शवणारी यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताने आपल्या सामर्थ्या दाखवत जगातील पहिल्या चार शक्तींमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. मात्र, एकेकाळी भारताला युद्धाच्या धमक्या देणारा आणि 'बढाई' मारणारा पाकिस्तान या शर्यतीत पुरता पिछाडीवर गेला आहे.
ग्लोबल फायरपॉवरची ही रँकिंग म्हणजे केवळ सैनिकांची मोजदाद नाही, तर हा एक महत्वाचा 'पॉवर इंडेक्स' आहे. यामध्ये सैन्य संख्या, अत्याधुनिक शस्त्रे, हवाई आणि नौदलाची क्षमता, संरक्षणावरील खर्च (बजेट), रसद पुरवठा आणि भौगोलिक स्थान अशा 60 हून अधिक कडक निकषांवर देशांना पारखले जाते. ज्या देशाचा स्कोअर 0.0000 च्या जितका जवळ, तो देश तितकाच ताकदवान मानला जातो. याच निकषावर अमेरिकेने 0.0741 स्कोअरसह आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे, तर रशिया आणि चीन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारताने यंदा 0.1346 या दमदार पॉवर इंडेक्स स्कोअरसह जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी शक्ती म्हणून आपला दबदबा निर्माण केला आहे. भारताने केवळ आपली पारंपारिक शस्त्रेच आधुनिक केली नाहीत, तर 'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानावर दिलेला भर आज जगाला थक्क करत आहे. दक्षिण कोरिया पाचव्या, तर फ्रान्स सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच देशांपैकी तीन आशियाई देश असल्याने, आता सत्तेचे केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हेही वाचा: Arijit Singh Announces Retirement : 'अच्छा चलता हूँ, दुवाओ में याद रखना...'; गायक अरिजीत सिंगचा धक्कादायक निर्णय
पाकिस्तानची रँकिंगमध्ये मोठी घसरण
एकीकडे भारत यशाची शिखरे सर करत असताना, पाकिस्तानला मात्र मोठा 'धक्का' बसला आहे. 2014 मध्ये पहिल्या 10 मध्ये असणारा हा देश आता 14 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. पाकिस्तानची ही घसरण केवळ लष्करी नाही, तर त्यांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेचेही प्रतिबिंब आहे. "विनाशकाले विपरीत बुद्धी" या उक्तीप्रमाणे, दहशतवादाला खतपाणी घालण्यात व्यस्त असलेल्या या देशाला आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण आणि रसद सांभाळणे आता जड जात आहे. भारताशी बरोबरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला आता जर्मनी (12 वा क्रमांक) सारख्या देशांनीही मागे टाकले आहे.
इतर देशांची क्रमवारी
या यादीत आणखी एक धक्कादायक बदल म्हणजे एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनची घसरण झाली असून तेआठव्या क्रमांकावर आले आहेत. तर दुसरीकडे, तुर्कीयेने नऊ आणि इटलीने दहाव्या क्रमांकावर मजल मारली आहे. युक्रेनसारखा देश रशियाशी दोन हात करत असतानाही रशियाने आपले दुसरे स्थान टिकवून ठेवले आहे, हे त्यांच्या लष्करी नियोजनाचे यश मानले जात आहे.
सामर्थ्यवान भारत, सुरक्षित भारत
ग्लोबल फायरपॉवरची 2026 ची आकडेवारी स्पष्ट करते की, भारत आता केवळ संरक्षणात्मक पवित्रा घेणारा देश राहिलेला नाही, तर गरज पडल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता ठेवणारी जागतिक शक्ती बनला आहे. पाकिस्तानची रँकिंग घसरणे हे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असून, भारताचा वाढता प्रभाव हा दक्षिण आशियातील स्थैर्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा: Social Media Ban: टिकटॉक-इन्स्टाग्रामला टाळं; 15 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी