दिल्ली: आजही सोन्याच्या दरात पुन्हा घसरण नोंदवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर कमी झाले असून, गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी ही मोठी घडामोड ठरत आहे. दिल्लीमध्ये सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर कमी होऊन 10 ग्रॅमसाठी 1,26,020 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,14,790 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.
धनतेरसच्या काळात सोन्याच्या किंमतींनी सातत्याने नवीन उच्चांक गाठले होते, मात्र दिवाळी संपताच बाजारात उलट चढ-उतार सुरू झाले आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरतेचा आणि डॉलरच्या मजबुतीचा परिणाम भारतीय सोन्याच्या दरांवर स्पष्टपणे दिसत आहे.
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,14,640 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,070 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. जयपूर, लखनऊ आणि चंदीगड येथे 24 कॅरेट सोनं 1,26,020 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
अहमदाबाद आणि भोपाल येथे 22 कॅरेट सोनं 1,14,790 रुपये, तर 24 कॅरेट सोनं 1,25,170 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
हेही वाचा: LIC New Scheme 2025 : एलआयसीच्या दोन नवीन योजना ठरणार महिलांसाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी लाभदायी
जागतिक बाजारातील घडामोडी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात 3 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. सिंगापूरमध्ये सोन्याचा हाजिर दर 0.4 टक्क्यांनी घसरून 4,111.40 डॉलर प्रति औंस झाला आहे. अमेरिकन डॉलरची मजबुती, अमेरिका-चीन व्यापार चर्चेत आलेली सकारात्मक घडामोड आणि गुंतवणूकदारांकडून नफावसुली केल्यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर बाजारात थोडी स्थिरता दिसत असली, तरी सोन्याचा दर या आठवड्यात 4,381.21 डॉलर प्रति औंस या उच्चांकावरून घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
2025 या वर्षात आतापर्यंत सोन्याने सुमारे 56 टक्क्यांची वाढ नोंदवली असली, तरी सध्याचा ट्रेंड घटता आहे.
चांदीच्या दरातही घसरण कायम
सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतींमध्येही घट सुरू आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचा दर कमी होऊन प्रति किलो 1,58,900 रुपये झाला आहे. दिवाळीपूर्वी चांदीने दररोज नवे उच्चांक गाठले होते, मात्र सध्या जागतिक बाजारात तिच्यात सुमारे 6 टक्के घसरण होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनीही सावध भूमिका घेणे आवश्यक आहे, कारण जागतिक बाजारातील हालचालींमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: Metro Line 3 Digital Ticket: मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता आणखीन सुखाचा, आता नुसतं “Hi” म्हणा... लगेचच तिकीट तयार!