मुंबई: देशातील बहुतांश शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या प्रचंड वाढीला सध्या विश्रांती मिळाल्याचे दिसत आहे. शनिवार, 9 मे 2026 रोजी सकाळी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित घसरण नोंदवण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे चेन्नईसारख्या शहरात सोन्याच्या दराने पुन्हा एकदा वरची पातळी गाठली आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात होणाऱ्या चढ-उतारांचा थेट परिणाम स्थानिक सराफा बाजारावर दिसून येत असून, गुंतवणूकदारांमध्ये सध्या संमिश्र वातावरण आहे.
राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,870 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत हेच दर 1,52,670 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले आहेत. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट होऊन तो 1,55,900 रुपयांवर बंद झाला होता. जागतिक स्तरावर सध्या सोन्याचा व्यवहार 4,721 डॉलर प्रति औंस या दराने सुरू असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतीय बाजारपेठेतही किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे.
देशातील महत्त्वाच्या शहरांमधील आजच्या दरांवर नजर टाकल्यास, सोन्याच्या किमतीत काही अंशी तफावत जाणवते. दिल्ली आणि जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,40,090 रुपये, तर 24 कॅरेटसाठी 1,52,870 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,670 रुपये इतका असून 22 कॅरेटसाठी 1,39,940 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. चेन्नईत मात्र सोन्याचे दर सर्वाधिक असून तिथे 24 कॅरेट सोने चक्क 1,53,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
हेही वाचा: Attack On Vikas Lavande: 'पिस्तूल रोखलं, शाई फेकली अन्...'; राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?
एकीकडे सोन्याच्या दरात किंचित नरमाई असताना, चांदीने मात्र चमक कायम राखली आहे. चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, आज 9 मे च्या सकाळी चांदीचा भाव 2,75,100 रुपये प्रति किलो या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी सध्या 81.14 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत असल्याने औद्योगिक क्षेत्रातूनही मोठी मागणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या 24 तासांतील बदलांचा आढावा घेतल्यास, शुक्रवारी दिल्लीच्या बाजारात चांदीचा दर 200 रुपयांनी घसरून 2,61,300 रुपयांवर आला होता. मात्र, शनिवारी सकाळी पुन्हा एकदा किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याचे भाव स्थिर होत असताना चांदीमधील ही वाढ मध्यमवर्गीय खरेदीदारांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. जागतिक बाजारपेठेतील डॉलरचे मूल्य आणि भू-राजकीय तणावामुळे येत्या काळात मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा बदल होऊ शकतात, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Suvendu Adhikari Oath Ceremony: बंगालमध्ये 'अधिकारी' पर्वाची सुरूवात! मोदी-शाहांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ