नवी दिल्ली: सलग विक्रमी उसळीनंतर गुरुवारी, 22 जानेवारी रोजी सोन्याच्या दरात काहीशी घसरण नोंदवण्यात आली. देशांतर्गत बाजारात सोने प्रति किलो 1,51,776 रुपयांवर आले असून, यात 1.02 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील सत्रात उच्चांकी पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने दरात ही घसरण दिसून आली.
मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याने 1,58,780 रुपयांचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने जोरदार झेप घेत 4,883 डॉलर प्रति औंसचा उच्चांक गाठला होता. यामागे युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यात ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव आणि नव्या व्यापार युद्धाच्या भीतीने बाजारात असलेली अस्थिरता हे प्रमुख कारण ठरले.
22 जानेवारी रोजी जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 4,788 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. मागील सत्राच्या तुलनेत यात 1.01 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. मात्र, ही घसरण तांत्रिक स्वरूपाची मानली जात असून, दीर्घकालीन कल अद्याप मजबूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा: Stock Market Today: गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू; शेअर बाजाराने सलग तीन दिवसांची मरगळ झटकली, नेमकं काय झालं?
अमेरिका, ग्रीनलँड, युरोप तसेच रशिया-युक्रेन संघर्ष अशा अनेक आघाड्यांवरील वाढता राजकीय तणाव गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीकडे वळवत आहे. डॉलरमधील अस्थिरता आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोनं सुरक्षित पर्याय म्हणून पुढे येत असून, त्यामुळेच बुलियन मार्केटमध्ये मोठी मागणी पाहायला मिळत आहे.
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, सध्याचे जोखीमपूर्ण वातावरण सोन्याच्या बाजूने आहे. “सोन्याने अपवादात्मक कामगिरी करत जवळपास 7,000 रुपयांची झेप घेत 1,57,500 पर्यंत मजल मारली. अवघ्या तीन सत्रांत दरात 15,000 रुपयांहून अधिक वाढ झाली असून, जानेवारी 2026 मध्ये आतापर्यंतच सुमारे 15 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तांत्रिकदृष्ट्या पाहता, सोन्यासाठी 1,45,000 रुपयांच्या आसपास मजबूत आधार पातळी (Support) असून, वरच्या बाजूला 1,61,000 रुपयांच्या आसपास प्रतिकार पातळी (Resistance) दिसत आहे. येत्या काळात जागतिक घडामोडींच्या दिशेनुसार सोन्याच्या दरात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळू शकतात, मात्र दीर्घकालीन दृष्टीने सोन्याचा कल सकारात्मक असल्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत.
हेही वाचा: Devendra Fadnavis: बळीराजाला मिळणार 24 तास वीज; 16 हजार मेगावॅट सौर ऊर्जा योजनेची मुख्यमंत्र्यांची दावोस मधून घोषणा