मुंबई: जागतिक भूराजकीय घडामोडी आणि बदलत्या आर्थिक समीकरणांमुळे देशांतर्गत सराफा बाजारात सध्या सोन्याचे दर फॉर्म मध्ये आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरांनी जुन्या सर्व विक्रमांना गवसणी घालत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या भावाने प्रथमच दीड लाखांचा विक्रमी टप्पा ओलांडला असून, चांदीने देखील 3 लाख 30 हजार लाखांची विक्रमी पातळी गाठत गुंतवणूकदारांना थक्क केले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या 20 दिवसांतच बाजारपेठेत आलेल्या या वादळामुळे सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंगळवारी सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली, जेव्हा सोन्याच्या दरात एकाच दिवसात 4,326 रुपयांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली. यामुळे प्रतितोळा सोन्याचा भाव 1,53,573 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे, केवळ दोन दिवसांच्या कालावधीत सोन्याच्या किमतीत 7 हजार रुपयांची भर पडली आहे. चांदीच्या बाबतीतही हेच चित्र असून, सोमवारी 18 हजार आणि मंगळवारी 15 हजार अशी दोन दिवसांत सुमारे 34 हजार रुपयांची वाढ होऊन चांदी आता 3.30 लाख प्रति किलो या नव्या शिखरावर विराजमान झाली आहे.
या दरवाढीमागे प्रामुख्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 'टॅरिफ वॉर'चा इशारा कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँड प्रकरणावरून युरोपीय देशांवर 10 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यामुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध पेटण्याची शक्यता आहे. अशा अस्थिर वातावरणात गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे वळल्याने मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
हेही वाचा: Sunita Williams: "अंतराळ हेच माझं घर..." भारतीय वंशाच्या 'स्पेस क्वीन' सुनीता विल्यम्स यांची नासातून निवृत्त
दुसरीकडे, चांदीच्या दरवाढीला चीनमधील वाढती औद्योगिक मागणी कारणीभूत ठरत आहे. सौर ऊर्जा (Solar Panels) आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) उत्पादनात चीनची मक्तेदारी असून, या दोन्ही क्षेत्रांत चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. चीनमधील चांदीचा साठा घटत चालल्याने आणि तिथून मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव वधारले आहेत. तांत्रिक आणि औद्योगिक गरजेमुळे चांदी आता केवळ दागिना न राहता एक 'महत्त्वाची औद्योगिक धातू' म्हणून समोर आली आहे.
बाजारपेठेतील या अनपेक्षित तेजीवर तज्ज्ञांनी सावधगिरीचा सल्ला दिला आहे. "नव्या गुंतवणूकदारांनी सध्या 'वाट पाहा आणि संयम ठेवा' (Wait and Watch) हे धोरण स्वीकारणे हिताचे ठरेल," असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. गेल्या 20 दिवसांतील वाढ अत्यंत वेगवान असल्याने नफा वसुलीसाठी (Profit Booking) किमतीत काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठी रक्कम एकदाच गुंतवण्यापेक्षा 'एसआयपी'च्या (SIP) माध्यमातून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरेल.
गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करणाऱ्यांसाठी तज्ज्ञांनी डिजिटल पर्यायांवर भर देण्याचे सुचवले आहे. प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेसचा भुर्दंड पडतो, त्याऐवजी गोल्ड ईटीएफ (ETF), सोव्हरन गोल्ड बाँड्स किंवा डिजिटल गोल्ड हे पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतात. चांदीमध्ये गुंतवणूक करताना ती एकूण पोर्टफोलिओच्या केवळ 5 ते 10 टक्के असावी, कारण चांदीतील अस्थिरता सोन्याच्या तुलनेत अधिक असते. एकूणच, 2026 च्या सुरुवातीलाच सोने -चांदीने दाखवलेली ही 'विराट' खेळी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची, तर सर्वसामान्यांसाठी काळजीत पाडणारी ठरत आहे.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar : वैजापुरात व्यापाऱ्यानं गळफास घेत संपवलं जीवन; 42 सेकंदांच्या व्हिडिओत मांडली व्यथा, 7 जणांवर गुन्हा दाखल