मुंबई: आजचा दिवस सराफा बाजारासाठी मोठ्या उलथापालथीचा ठरला आहे. जागतिक बाजारपेठेत नफा वसुलीमुळे (Profit Booking) किमतीत अल्पशी घसरण पाहायला मिळत असली, तरी भारतीय बाजारपेठेत मात्र सोने-चांदीच्या भावांनी जणू गगनभरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर COMEX वर सोन्याचा भाव प्रति औंस 5019.60 डॉलर आणि चांदी 106.99 डॉलरवर स्थिरावली असताना, भारतातील चित्र मात्र याच्या अगदी उलट असून किमतींनी नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात काल सोने-चांदीने ऐतिहासिक विक्रमी पातळी ओलांडली होती. आज मात्र गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफा पदरात पाडून घेण्यास सुरुवात केल्याने किमतीत किंचित घट झाली आहे. मात्र, भारतीय वायदा बाजारात (MCX) आज सकाळी बाजार उघडताच चांदीने अक्षरशः रुद्रावतार धारण केल्याचे पाहायला मिळाले. चांदीच्या वायद्यात तब्बल 20000 रुपयांची जोरदार वाढ नोंदवली गेली असून, प्रति किलो चांदीचा दर 356508 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या या वाढीने सामान्य ग्राहकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
हेही वाचा: Ration Card Benefits: पुणेकरांनो सावधान; 68 हजार रेशन कार्डांवर टांगती तलवार; तुमचे नाव तर यामध्ये नाही ना?
सोन्याच्या बाबतीतही चित्र वेगळे नाही. MCX वर सोन्याचा वायदा 2495 रुपयांनी वधारून 158532 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. प्रत्यक्ष सराफा बाजारात खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना आज 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 148450 रुपये मोजावे लागत आहेत, तर शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव 161950 रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली ही तेजी खरेदीदारांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे.
या प्रचंड दरवाढीमागे जागतिक राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा मोठा वाटा आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात होणारी व्यापार शुल्कावरील (Trade Tariffs) सुनावणी आणि फेडरल रिझर्व्हचा आगामी व्याजदर निर्णय या दोन महत्त्वाच्या घटनांकडे विश्लेषकांचे बारीक लक्ष लागले आहे. या निर्णयांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होणार असल्याने सध्या बाजार अत्यंत संवेदनशील बनला आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून मोठ्या प्रमाणावर त्याकडे वळताना दिसत आहेत.
दरम्यान, भारतात आता सर्वांचे लक्ष 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या आयात शुल्कात (Import Duty) काही कपात करणार का, याकडे सराफा व्यावसायिक आणि सामान्य ग्राहक दोघांचेही लक्ष आहे. आयात शुल्कात सवलत मिळाल्यास देशांतर्गत बाजारात किमती काहीशा नरमण्याची शक्यता आहे; अन्यथा सोने-चांदीची ही दरवाढ अशीच सुरू राहण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
हेही वाचा: India Warns Pakistan: ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू जल करार यामधील सत्य समोर, भारताने युनोमध्ये पाकिस्तानची बोलती केली बंद