Tourist Places Reopened : जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी केंद्रशासित प्रदेशातील 14 महत्त्वाची पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा कारणास्तव ही स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली होती. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या त्या दुर्दैवी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये पर्यटकांची संख्या मोठी होती. त्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 50 पर्यटन स्थळांवर बंदी घातली होती.
सुरक्षा आढाव्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
"सखोल सुरक्षा आढावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, मी काश्मीर आणि जम्मू विभागातील अधिक पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत," अशी माहिती उपराज्यपाल कार्यालयाने 'X' (ट्विटर) वरील पोस्टद्वारे दिली. या ताज्या आदेशासह, तात्पुरत्या बंदीनंतर पुन्हा उघडण्यात आलेल्या एकूण पर्यटन स्थळांची संख्या आता 26 झाली आहे. यापूर्वी, 26 सप्टेंबर 2025 रोजी उपराज्यपालांनी 12 पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 14 स्थळे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.
ही पर्यटन स्थळे तात्काळ सुरू होणार
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर विभागातील 11 पर्यटन स्थळे तात्काळ खुली केली जाणार आहेत. यामध्ये युसमार्ग, दूधपथरी, कोकेरनागमधील दांडीपुरा पार्क, शोपियानमधील पीर की गली, दुबजान आणि पदपावन, अस्तानपोरा, ट्यूलिप गार्डन, श्रीनगरमधील थजवास ग्लेशियर, गंदरबलमधील हँग पार्क आणि बारामुल्लामधील वुलर आणि वाटलाब यांचा समावेश आहे. तसेच जम्मू विभागातील रियासीमधील देवी पिंडी, रामबनमधील महू मंगत आणि किश्तवारमधील मुघल मैदान ही 3 स्थळेही आजपासून पर्यटकांसाठी खुली होतील.
हेही वाचा - India’s First Cow Culture Museum: मथुरेच्या वैभवात भर! देशातील पहिले 'राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय' मंजूर; विज्ञानाच्या नजरेतून उलगडणार गोमातेचा महिमा
बर्फ वितळल्यानंतर उर्वरित स्थळे उघडणार
काही पर्यटन स्थळे सध्या बर्फाच्छादित असल्याने ती उघडण्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. सिन्हा यांनी स्पष्ट केले की, काश्मीर विभागातील गुरेझ, अठवा आणि बंगस ही 3 स्थळे आणि जम्मू विभागातील रामबनमधील रामकुंड हे 1 स्थळ बर्फ वितळल्यानंतर पर्यटकांसाठी खुले केले जाईल. प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक आणि पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळात पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.