Thursday, March 12, 2026 09:30:45 PM

Google AIIMS Partnership : गुगलची एम्ससोबत ऐतिहासिक भागीदारी; सुंदर पिचाईंनी स्पष्ट केली गुगलची आगामी रणनीती

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' मध्ये सहभागी होण्यापूर्वी पिचाई यांनी भारतातील सर्वात मोठी आरोग्य संस्था एम्स (AIIMS) सोबत विशेष भागीदारीची घोषणा केली.

google aiims partnership  गुगलची एम्ससोबत ऐतिहासिक भागीदारी सुंदर पिचाईंनी स्पष्ट केली गुगलची आगामी रणनीती

Google AIIMS Partnership : गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई सध्या भारत दौऱ्यावर आहेत. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' मध्ये सहभागी होण्यापूर्वी पिचाई यांनी भारतातील सर्वात मोठी आरोग्य संस्था एम्स (AIIMS) सोबत विशेष भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे एम्समध्ये उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना आणि सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा लाभ मिळणार आहे.

रुग्ण आणि डॉक्टरांसाठी एआय ठरणार वरदान
भागीदारीबद्दल माहिती देताना सुंदर पिचाई यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आरोग्य सेवा अधिक सोपी आणि अचूक बनवेल. एआयचा वापर करून रुग्णांचे क्लिष्ट अहवाल त्वरित तयार करता येतील, ज्यामुळे डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी होईल आणि त्यांना उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. सध्या हे प्रकल्प सुरुवातीच्या टप्प्यात असले तरी, भविष्यात एआय शिक्षण, रुग्णालय व्यवस्थापन आणि सरकारी सेवा सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी आणि सुंदर पिचाई यांची भेट
दरम्यान, बुधवार, 18 फेब्रुवारी रोजी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत भारतातील एआय संधी आणि गुगलसोबतचे सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी यावेळी नमूद केले की, भारतात एआय क्षेत्र वेगाने प्रगती करत असून गुगलसारख्या जागतिक कंपन्यांच्या सोबतीने आरोग्य, कृषी आणि भाषा समर्थन यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवून आणता येतील.

हेही वाचा - Galgotias University Controversy: AI समिटमध्ये चिनी रोबोटवरून वाद; गलगोटियास विद्यापीठाचा स्टॉल हटवला, काय आहे नेमकं प्रकरण?

भारत दौऱ्याबाबत सकारात्मक प्रतिसाद
पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर पिचाई यांनी आनंद व्यक्त केला. "पंतप्रधान मोदींसोबतची चर्चा अतिशय सकारात्मक होती. भारतातील आरोग्य आणि कृषी क्षेत्रात एआयचा समावेश करण्याबाबत आम्ही उत्सुक आहोत," असे पिचाई म्हणाले. याच शिखर परिषदेत गुगलने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स 'गुगल आय/ओ 2026' च्या तारखांचीही घोषणा केली. हा कार्यक्रम 19 आणि 20 मे रोजी कॅलिफोर्नियामध्ये पार पडणार आहे.


सम्बन्धित सामग्री