Google Play Store App Ban: अँड्रॉइड इकोसिस्टम सुरक्षित करण्यासाठी आणि युजर्सचा डेटा वाचवण्यासाठी टेक दिग्गज गुगलने (Google) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. गुगल प्ले स्टोअरच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 1.75 दशलक्षाहून अधिक बनावट ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, गोपनीयता धोरणांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही कठोर पाऊले उचलली आहेत.
मालवेअर आणि आर्थिक फसवणुकीला लगाम
गुगलने स्पष्ट केले आहे की, बंदी घालण्यात आलेल्या या ॲप्समध्ये घातक 'मालवेअर' आढळून आले होते. हे ॲप्स युजर्सची आर्थिक फसवणूक करणे, सुप्त सबस्क्रिप्शन (Hidden Subscriptions) लादणे आणि वैयक्तिक गोपनीयतेला धोका निर्माण करण्याचे काम करत होते. विशेष म्हणजे, 'गुगल प्ले प्रोटेक्शन'च्या प्रगत AI डिटेक्शन टूलचा वापर करून हे ॲप्स सामान्य युजर्सपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ओळखून ब्लॉक करण्यात आले आहेत.
80,000 डेव्हलपर्सचे अकाउंट्स लॉक
19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या ब्लॉग पोस्टनुसार, केवळ ॲप्सवर बंदी घालून गुगल थांबलेले नाही. फसवणूक आणि वारंवार धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या 80,000 डेव्हलपर्सचे अकाउंट्स देखील कायमस्वरूपी लॉक करण्यात आले आहेत. गुगलच्या सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या AI टूल्सनी 2,55,000 ॲप्सना संवेदनशील युजर डेटा चोरण्यापासून यशस्वीरित्या रोखले आहे.
अँड्रॉइड इकोसिस्टम होणार अधिक सुरक्षित
अमेरिकन टेक कंपनीने 2025 पर्यंत संपूर्ण अँड्रॉइड इकोसिस्टम सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी गोपनीयता धोरणे अधिक कडक करण्यात आली असून, प्ले स्टोअरवरील ॲप्सचे 'अँड्रॉइड स्टुडिओ' आणि 'डेटा सुरक्षा विभागा'च्या माध्यमातून सतत निरीक्षण केले जात आहे. AI संचालित ही प्रणाली आता डेव्हलपमेंट स्टेजवरच ॲप्सचे विश्लेषण करून मालवेअर, स्पायवेअर आणि आर्थिक घोटाळे शोधून काढत आहे.
हेही वाचा - Electricity From Space: ऐकावं ते नवलच! घरातील बल्ब आता थेट सॅटेलाईटद्वारे पेटणार? 'या' देशाने चक्क आकाशातच 'पॉवर स्टेशन' उघडलंय
स्पॅम रेटिंग्ज आणि रिव्ह्यूवर कारवाई
वापरकर्त्यांची दिशाभूल टाळण्यासाठी गुगलने आपली 'अँटी-स्पॅम' सिस्टीम देखील अपग्रेड केली आहे. यामुळे सुमारे 160 दशलक्ष स्पॅम रेटिंग्ज आणि बनावट रिव्ह्यू (Reviews) ब्लॉक करण्यात आले आहेत. बनावट रेटिंगच्या जोरावर युजर्सना फसवणाऱ्या डेव्हलपर्सना आळा घालण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.