Thursday, March 12, 2026 11:12:13 PM

Marriage Registration New Rules: ‘आधी घरच्यांना कळवा, मगच...’; पळून जाऊन लग्न करणे कठीण होणार? विवाह नियमांत मोठा बदल

विवाह नोंदणीपूर्वी आई-वडिलांना माहिती देणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. नव्या नियमांमुळे पळून जाऊन किंवा कुटुंबाच्या नकळत लग्न करणे कठीण होण्याची शक्यता आहे.

marriage registration new rules ‘आधी घरच्यांना कळवा मगच’ पळून जाऊन लग्न करणे कठीण होणार विवाह नियमांत मोठा बदल



गुजरात: लवकरच लग्नाची प्रक्रिया अधिक कडक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने विवाह नोंदणीसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल सुचवले असून, त्यानुसार लग्नाची नोंदणी करण्यापूर्वी संबंधित जोडप्याने आपल्या आई-वडिलांना विवाहाबाबत माहिती दिल्याची नोंद करणे आवश्यक ठरणार आहे. या प्रस्तावामुळे कुटुंबाच्या संमतीशिवाय किंवा नकळत विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी नवी अडचण निर्माण होऊ शकते.

सरकारने विवाह नोंदणी कायद्यातील तरतुदींमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. विशेषतः नियम 44 मध्ये बदल सुचवण्यात आला असून, विवाह नोंदणी प्रक्रियेत पालकांची माहिती अनिवार्य करण्याचा विचार आहे. या बदलाचा उद्देश पारदर्शकता वाढवणे आणि कौटुंबिक वाद टाळणे असा सरकारचा दावा आहे. प्रस्तावित नियमानुसार, विवाह नोंदणीसाठी अर्ज करताना जोडप्याला एक अधिकृत घोषणापत्र द्यावे लागेल. त्यामध्ये त्यांनी आपल्या आई-वडिलांना विवाहाची माहिती दिली आहे की नाही, याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. तसेच आई आणि वडिलांचे नाव, कायमचा पत्ता, ओळखपत्राची माहिती आणि संपर्क क्रमांक सादर करणे बंधनकारक असेल.

यानंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अधिकृत यंत्रणेकडून पालकांना विवाहाबाबत सूचना पाठवण्यात येईल. ही सूचना लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्यात येऊ शकते. यामुळे विवाह नोंदणी प्रक्रिया बहु-स्तरीय होणार असून, अंतिम नोंदणीपूर्वी सर्व माहितीची खातरजमा केली जाईल. सरकारने या प्रस्तावित बदलांवर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आलेल्या सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या प्रस्तावावर सामाजिक आणि कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. काही जण याला कुटुंबव्यवस्थेला बळ देणारा निर्णय मानत आहेत, तर काहींच्या मते हा वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम करणारा ठरू शकतो. अंतिम निर्णयानंतरच या नव्या नियमांचा नेमका परिणाम स्पष्ट होणार आहे.


सम्बन्धित सामग्री