केरळ: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळ दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना घेऊन जाण्यासाठी जेव्हा हेलिकॉप्टर बुधवारी प्रमादोम स्टेडियमवर उतरले, तेव्हा हॅलिपॅडचा एक भाग मातीत रुतला आणि त्यात खड्डा निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ हेलिकॉप्टरला अडकलेल्या भागातून बाहेर काढले. या घटनेत, राष्ट्रपती दौपदी मुर्मू आणि इतर कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'राष्ट्रपती मुर्मू सबरीमाला मंदिराचे दर्शन घेण्यासाठी केरळमध्ये आले होते. त्यासाठी, हॅलिकॉप्टरला केरळमधील पंबा जवळ असलेले निलक्कल येथे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तेथील हवामान खराब असल्यामुळे हॅलिकॉप्टरला प्रमादोम स्टेडियमवर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, मंगळवारी रात्री उशिरा हेलिपॅड बांधण्यात आले. मात्र, याठिकाणी काँक्रीट घट्ट बसले नव्हते. त्यामुळे, हॅलिकॉप्टर खाली उतरताच हॅलिपॅड हेलिकॉप्टरचे वजन नाही पेलू शकले, ज्यामुळे खड्डा निर्माण झाला. सुदैवाने, घटनेच्या वेळी राष्ट्रपती मुर्मू हेलिकॉप्टरमध्ये नव्हते'.
हेही वाचा: Air India Flight Technical Snag: हवेत तांत्रिक बिघाड! एअर इंडियाचे नेवार्कला जाणारे विमान मुंबईत परतले
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 21 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत केरळ दौऱ्यावर आहेत. तसेच, 22 ऑक्टोबर रोजी द्रौपदी मुर्मू सबरीमाला मंदिरात दर्शन आणि आरतीसाठी उपस्थित होते. यानंतर, 23 ऑक्टोबर रोजी द्रौपदी मुर्मू केरळमधील तिरुवनंतपुरम येथे के.आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शिवगिरी मठात श्री नारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करतील. 24 ऑक्टोंबर रोजी द्रौपदी मुर्मू एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा केरळ दौरा समाप्त होईल.