रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन यांनी झारखंडचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे इंडी आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत फक्त हेमंत सोरेन यांचाच शपथविधी झाला. झारखंड सरकारच्या एकाही मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही.
इंडी आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला. झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलचे नेता तेजस्वी यादव, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानस, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सर्व जण हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला उपस्थित होते.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आणि मतमोजणी शनिवार 23 नोव्हेंबर रोजी झाली. विधानसभेच्या 81 पैकी 34 जागा जिंकत झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले. काँग्रेसने निवडणुकीत 16 जागांवर विजय मिळवला.
झारखंड विधानसभा निवडणूक
- एकूण जागा 81
- झारखंड मुक्ती मोर्चा 34 जागांवर विजय
- भारतीय जनता पार्टी 21 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- राष्ट्रीय जनता दल 4 जागांवर विजय
- मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 2 जागांवर विजय
- एजेएसयू पार्टी, रामविलास पासवानांची लोक जनशक्ती पार्टी, झारखंड लोकतांत्रिक क्रांती मोर्चा, जनता दल संयुक्त - प्रत्येकी एका जागेवर विजय