Tuesday, March 10, 2026 11:39:54 AM

Asia Cup 2025: आशिया कप 2025 : भारताचा नववा किताब, सूर्यकुमार यादवची ऐतिहासिक घोषणा

आशिया कप 2025 फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत सलग नवव्यांदा किताब जिंकला. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मॅच फी भारतीय सैन्यदलाला देण्याची घोषणा करून सर्वांचे मन जिंकले.

asia cup 2025 आशिया कप 2025  भारताचा नववा किताब सूर्यकुमार यादवची ऐतिहासिक घोषणा

दुबई येथे झालेल्या आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करत सलग नवव्यांदा विजय मिळवला आहे. रोमांचक लढतीत भारताने दमदार खेळ दाखवत पाक संघाला धूळ चारली. या विजयासह भारताने आशिया कपमध्ये आपलं वर्चस्व आणखी ठळक केलं. मात्र सामन्यानंतर घडलेल्या एका निर्णयामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष भारतीय संघाकडे वळले.

कर्णधार सूर्यकुमार यादवने रात्री अडीच वाजता पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली. त्याने स्पर्धेत मिळालेली संपूर्ण मॅच फी भारतीय सैन्यदलाला देण्याचा निर्णय घेतला. विजयाबाबत बोलताना तो म्हणाला की, “ही ट्रॉफी फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नाही. सीमारेषेवर देशाचे रक्षण करणारे जवानच खरे हिरो आहेत. त्यांच्या त्यागाला ही लहानशी भेट समर्पित आहे.” त्याच्या या भूमिकेचं जगभरातून कौतुक होत आहे.

फायनलनंतरच्या पुरस्कार सोहळ्यात अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली. भारतीय संघाने एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. संघाने स्पष्ट केले की विजेत्या संघाला योग्य प्रकारे सन्मान मिळणे गरजेचे आहे आणि नकवींकडून ट्रॉफी घेणे त्यांना मान्य नाही. परिणामी पदकं आणि ट्रॉफी दोन्ही घेण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.

या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने संघाच्या कामगिरीचे कौतुक करत तब्बल 21 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली. हे बक्षीस खेळाडू व सपोर्ट स्टाफमध्ये वाटले जाणार असल्याचे बीसीसीआय सचिवांनी सांगितले. संघाच्या सलग आणि एकतर्फी विजयांमुळे भारतीय क्रिकेटची ताकद पुन्हा अधोरेखित झाली.

भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018, 2023 आणि आता 2025 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. यामुळे आशिया कपच्या इतिहासातील सर्वाधिक नऊ विजयांचा मान भारताने पटकावत आपलं वर्चस्व मजबूत केले. या स्पर्धेतील विजयाला संघाचा खेळ जितका कारणीभूत होता तितकाच सूर्यकुमारच्या देशभक्तीपूर्ण घोषणेलाही विशेष महत्त्व लाभले.


सम्बन्धित सामग्री