Monday, March 09, 2026 08:21:31 AM

UTS App : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 1 मार्चपासून 'UTS' अ‍ॅप कायमचे बंद, आता 'या' अ‍ॅपवर मिळतील सर्व सेवा

येत्या 1 मार्च 2026 पासून रेल्वेचे सध्याचे अनारक्षित तिकीट बुकिंग अ‍ॅप म्हणजेच 'UTS' पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

uts app  रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी 1 मार्चपासून uts अ‍ॅप कायमचे बंद आता या अ‍ॅपवर मिळतील सर्व सेवा

UTS App : भारतीय रेल्वेने आपल्या डिजिटल तिकीट प्रणालीत क्रांतीकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मार्च 2026 पासून रेल्वेचे सध्याचे अनारक्षित तिकीट बुकिंग अ‍ॅप म्हणजेच 'UTS' पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी आता प्रवाशांना रेल्वेच्या नवीन सुपर अ‍ॅप 'RailOne' चा वापर करावा लागणार आहे.

'UTS' ची जागा घेणार 'RailOne' सुपर अ‍ॅप
आतापर्यंत जनरल तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी प्रवासी 'UTS' अ‍ॅप वापरत होते. मात्र, प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशाने रेल्वेने हे अ‍ॅप टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्च नंतर हे अ‍ॅप काम करणे थांबवेल आणि त्याचे सर्व कामकाज गेल्या वर्षी लाँच झालेल्या RailOne अ‍ॅपवर स्थलांतरित केले जाईल.

एकाच ठिकाणी सर्व सुविधांचे 'वन-स्टॉप' सोल्यूशन
RailOne हे केवळ जनरल तिकिटापुरते मर्यादित नाही. या अ‍ॅपमध्ये प्रवाशांना खालील सर्व सेवा एकात्मिक स्वरूपात मिळतील:

आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग.
पीएनआर (PNR) स्टेटस आणि लाईव्ह ट्रेन रनिंग स्टेटस.
कोच पोझिशन आणि प्लॅटफॉर्म माहिती.
आयआरसीटीसी (IRCTC) रेल कनेक्ट, एनटीईएस (NTES) आणि रेल मदत या सेवांचे एकत्रीकरण.
'फूड ऑन ट्रॅक' द्वारे जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा.

आर-वॉलेटमधील पैशांचे काय होणार?
'UTS' अ‍ॅप वापरणाऱ्या प्रवाशांच्या मनात 'आर-वॉलेट'मधील (R-Wallet) शिल्लक रकमेबाबत शंका होती. मात्र, रेल्वेने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांची ही रक्कम वाया जाणार नाही. प्रवासी त्यांच्या जुन्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून RailOne मध्ये साइन-इन करू शकतात. त्यांचे सर्व वॉलेट बॅलन्स नवीन अ‍ॅपमध्ये आपोआप उपलब्ध होईल. तसेच युपीआय (UPI), डेबिट/क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंटचे पर्यायही कायम राहतील.

हेही वाचा - Passport Rule Changes: पासपोर्ट नियमांत मोठे बदल; 15 फेब्रुवारीपासून प्रक्रिया होणार पूर्णपणे हायटेक अन् पेपरलेस

जनरल तिकिटांवर 3 टक्के सवलत आणि विशेष ऑफर
नवीन अ‍ॅपला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना विशेष सवलत जाहीर केली आहे. RailOne अ‍ॅपवरून डिजिटल पेमेंटद्वारे जनरल तिकीट बुक केल्यास प्रवाशांना 3 टक्के सूट मिळणार आहे. ही ऑफर 14 July 2026 पर्यंत वैध असणार आहे. प्रवाशांनी तिकीट बुकिंगमधील अडथळे टाळण्यासाठी 1 March पूर्वीच हे अ‍ॅप डाऊनलोड करून आपले प्रोफाइल सेट करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री