दक्षिण आशियात तणाव शिगेला पोहोचला असून अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही आपल्या पश्चिम सीमेवर सतर्कता वाढवली आहे. अफगाण तालिबानकडून पाकिस्तानवर वाढत्या हल्ल्यांमुळे इस्लामाबादमधील सत्ताकेंद्रांवर दबाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी भारताने राजस्थानमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या पोखरण येथे ‘वायू शक्ती’ युद्धाभ्यासाद्वारे आपली लष्करी ताकद प्रदर्शित केली.
अफगाण तालिबानने पाकिस्तानवर प्रत्युत्तरात्मक कारवाया केल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव तीव्र झाला आहे. पाकिस्तानने ‘ऑपरेशन गझब लिल-हक’ अंतर्गत अफगाणिस्तानात हवाई कारवाया केल्याचा दावा केला, तर त्यानंतर अफगाण गटांनी इस्लामाबादला लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण दक्षिण आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा:Pakistan Afghanistan War: अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये 'ओपन वॉर'ची ठिणगी; सीमाभागात जोरदार धुमश्चक्री, लष्कराचे मोठे नुकसान
या अस्थिर वातावरणात भारताने कोणतीही थेट हस्तक्षेपाची घोषणा केलेली नसली, तरी सीमावर्ती भागात लष्करी सज्जता वाढवली आहे. विशेषतः राजस्थानातील जैसलमेर सीमेजवळील पोखरणमध्ये भारतीय वायूसेनेने व्यापक युद्धाभ्यास करत आपली क्षमता दाखवून दिली. या सरावात अत्याधुनिक लढाऊ विमानांचा सहभाग होता.
भारतीय वायूसेनेच्या ताफ्यातील राफेल, सुखोई एसयू-30 एमकेआय,एचएएल तेजस आणि दसॉल्ट मिराज 2000 या लढाऊ विमानांनी अचूक लक्ष्यभेदाचा सराव केला. शत्रूचे बंकर, धावपट्ट्या आणि कमांड सेंटर उद्ध्वस्त करण्याचे प्रात्यक्षिक या सरावात दाखवण्यात आले.
हेही वाचा:Plane Crash: आणखी एक भीषण विमान अपघात! लँडिंगदरम्यान विमानाचा ताबा सुटला; अनेक वाहनांना धडक देत थेट रस्त्यावर कोसळलं, भयावह व्हिडिओ समोर
तसेच बोईंग AH-64 अपाचे (अटॅक हेलिकॉप्टर) आणि बोईंग CH-47 चिनूक (जड वाहतूक हेलिकॉप्टर) हेलिकॉप्टर्सनीही जमिनीच्या जवळून उड्डाण करत रॉकेट हल्ल्यांचा सराव केला. जखमी सैनिकांना हलवणे आणि रसद पुरवठा यांसारख्या मोहिमांचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या युद्धाभ्यासात ‘नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रगत रडार, ड्रोन आणि रिअल-टाइम डेटा शेअरिंगच्या मदतीने लक्ष्य निश्चित करून अचूक हल्ले करण्यात आले. दिवस-रात्र कोणत्याही वेळी कारवाई करण्याची क्षमता भारतीय वायूसेनेने सिद्ध केली.
तज्ज्ञांच्या मते, हा सराव थेट कोणत्याही देशाला उद्देशून नसला तरी भारताच्या सुरक्षाव्यवस्थेची सज्जता दाखवणारा स्पष्ट संदेश आहे. सीमाभागात तणाव वाढला असला तरी भारताने संयम राखत रणनीतिक तयारी मजबूत ठेवली आहे. दक्षिण आशियातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.