नवी दिल्ली: अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफमुळे भारताच्या निर्यात बाजाराला मोठा धक्का बसला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (Global Trade Research Initiative) च्या ताज्या आकडेवारीनुसार, मे ते सप्टेंबर 2025 या कालावधीत भारताचा अमेरिकेला होणारा निर्यात दर 37.5 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. अमेरिकेने एप्रिल 2025 मध्ये भारतीय वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लावले होते, जे ऑगस्टपर्यंत वाढून 50 टक्क्यांपर्यंत पोहोचले. या निर्णयानंतर भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात 8.8 अब्ज डॉलरवरून घसरून केवळ 5.5 अब्ज डॉलरवर आली. इतकी मोठी घट भारताच्या निर्यात इतिहासात यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती.
या घसरणीचा सर्वाधिक फटका त्या वस्तूंना बसला आहे ज्या आधी टॅरिफ-फ्री होत्या. अशा वस्तू भारताच्या एकूण अमेरिकी निर्यातीत जवळपास एक-तृतीयांश होत्या. GTRI च्या अहवालानुसार, या श्रेणीत तब्बल 47 टक्के घट झाली आहे. मे महिन्यात अशा वस्तूंची निर्यात 3.4 अब्ज डॉलर इतकी होती, जी सप्टेंबरमध्ये घटून फक्त 1.8 अब्ज डॉलरवर आली.
हेही वाचा: Anil Ambani Fraud Case: शेल कंपन्यांमार्फत पैसा फिरवला? अनिल अंबानींवर मनी लाँडरिंगचा गंभीर आरोप
फार्मास्युटिकल (औषध) क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. औषध निर्यातीत 15.7 टक्क्यांची घट झाली असून ती 745.6 दशलक्ष डॉलरवरून 628.3 दशलक्ष डॉलरवर आली आहे. औद्योगिक धातू आणि ऑटो पार्ट्स क्षेत्रातही सरासरी 16.7 टक्क्यांची घट झाली आहे. यामध्ये अॅल्युमिनियम 37 टक्के, कॉपर 25 टक्के, ऑटो कंपोनेंट 12 टक्के आणि लोखंड-स्टील 8 टक्के इतकी घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते, ही घट भारताच्या स्पर्धात्मकतेमुळे नसून अमेरिकेतील औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे झाली आहे.
स्मार्टफोन निर्यात क्षेत्रातही मोठी पडझड झाली आहे. 2024-25 या कालावधीत एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान स्मार्टफोन निर्यातीत 197 टक्क्यांनी वाढ झाली होती, पण आता ती 58 टक्क्यांनी घसरली आहे. मे महिन्यात 2.29 अब्ज डॉलरचा स्मार्टफोन निर्यात मूल्य सप्टेंबरमध्ये फक्त 884.6 दशलक्ष डॉलर इतका राहिला. कामगारांवर आधारित क्षेत्रांमध्ये जसे वस्त्रोद्योग, रत्न-आभूषण, रासायनिक उत्पादन आणि कृषी-आधारित उद्योग यामध्ये 33 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे. विशेषतः रत्न आणि दागिने उद्योगात 60 टक्क्यांची भीषण घट झाली आहे.
मे महिन्यात या क्षेत्राचे निर्यात मूल्य 500.2 दशलक्ष डॉलर होते, जे सप्टेंबरमध्ये फक्त 202.8 दशलक्ष डॉलरवर आले. या घसरणीमुळे थायलंड आणि व्हिएतनामसारख्या देशांनी भारताचा बाजार हिस्सा झपाट्याने काबीज करण्यास सुरुवात केली आहे. सोलर आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रावरही टॅरिफचा परिणाम झाला आहे. पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा (renewable energy) क्षेत्रात 60.8 टक्क्यांची घट झाली असून सोलर पॅनलची निर्यात 202.6 दशलक्ष डॉलरवरून 79.4 दशलक्ष डॉलरवर घसरली आहे. चीन आणि व्हिएतनामला अमेरिकेत तुलनेने कमी टॅरिफ (20–30 टक्के) चा फायदा मिळत असल्यामुळे त्यांची निर्यात वाढत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर भारताने लवकर धोरणात्मक पातळीवर निर्णय घेतला नाही, तर व्हिएतनाम, मेक्सिको आणि चीनसारख्या देशांकडून भारत पारंपरिक आंतरराष्ट्रीय व्यवहार गमावू शकतो. GTRI च्या अहवालानुसार, या टॅरिफनी भारतीय निर्यातदारांच्या नफ्यावर मोठा दबाव टाकला आहे आणि भारताच्या निर्यात क्षेत्रातील रचनात्मक कमजोरी उघड केली आहे.
हेही वाचा: Jay Shah and Harmanpreet Kaur Video : संस्कार! हरमनप्रीत कौर जय शाहांच्या पडली पाया, पण पुढे असं काही घडलं की...