Wednesday, February 18, 2026 05:05:19 PM

India Pakistan Cricket Match: पीसीबीच्या 'त्या' निर्णयाने खळबळ; भारत पाकिस्तान सामना मैदानावर होण्यापूर्वीच कोलमडले करोडो रुपयांचे गणित

या सामन्याची क्रेझ इतकी असते की, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी ब्रँड्सना 25 ते 40 लाख रुपये मोजावे लागतात.

india pakistan cricket match पीसीबीच्या त्या निर्णयाने खळबळ भारत पाकिस्तान सामना मैदानावर होण्यापूर्वीच कोलमडले करोडो रुपयांचे गणित

नवी दिल्ली: 'क्रिकेट' हा केवळ खेळ नसून भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी ती एक भावना आहे. मात्र, टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वीच या महाकुंभाला वादाचे गालबोट लागले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board, PCB) भारताविरुद्ध सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. "सरकारच्या आदेशाशिवाय आम्ही मैदानात उतरणार नाही," ही पीसीबीची भूमिका केवळ खेळाडूंच्या जिद्दीची नसून, यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council, ICC) तिजोरीवर मोठी टांगती तलवार आली आहे. 'मैदानातील लढाई' आता 'आर्थिक गणितांच्या' वादात अडकली आहे.

आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना हा 'दुभती गाय' मानला जातो. या एका सामन्यातून मिळणारा महसूल इतर अनेक सामन्यांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असतो. सूत्रांच्या माहितीनुसार, या हाय व्होल्टेज सामन्यातून आयसीसीला साधारणतः 200 कोटी रुपयांच्या कमाईची अपेक्षा असते. ब्रॉडकास्टर्स केवळ याच सामन्याच्या जोरावर कोट्यवधींच्या बोली लावतात. जर हा सामना रद्द झाला, तर आयसीसीच्या एकूण महसुलाला भगदाड पडणार असून, याचे दूरगामी परिणाम जागतिक क्रिकेटच्या अर्थकारणावर होतील.

या सामन्याची क्रेझ इतकी असते की, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी ब्रँड्सना 25 ते 40 लाख रुपये मोजावे लागतात. कंपन्या या सामन्यासाठी आपली संपूर्ण मार्केटिंग बजेट राखून ठेवतात. मात्र, सामना न खेळण्याच्या पीसीबीच्या निर्णयामुळे जाहिरातदारांनी आता माघार घेण्यास सुरुवात केली आहे. जाहिरातींच्या दरात होणारी ही संभाव्य घट ब्रॉडकास्टर्सच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरणार आहे.

हेही वाचा: Grammys Awards 2026: दलाई लामा यांना 90 व्या वर्षी मिळाला ग्रॅमी पुरस्कार; किती आहे या बौद्ध धर्मगुरूंची संपत्ती? वाचा

भारतामधील प्रसारणाचे हक्क असलेल्या 'जिओ-हॉटस्टार' सारख्या दिग्गजांसाठी हा मोठा आर्थिक धक्का असेल. मीडिया राईट्ससाठी मोजलेली अवाढव्य रक्कम वसूल करण्यासाठी भारत - पाकिस्तान सामना होणे अनिवार्य असते. आयसीसीचे महसूल वाटप मॉडेल हे सर्व सदस्य देशांना उत्पन्न मिळवून देते. जर मुख्य महसूलच बुडाला, तर केवळ बीसीसीआय किंवा पीसीबीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या छोट्या क्रिकेट बोर्डांना मिळणाऱ्या निधीतही मोठी कपात होऊ शकते.

आयसीसी आता या प्रकरणाकडे 'करडी नजर' लावून आहे. नियमावलीनुसार, कोणत्याही ठोस कारणाशिवाय सामना खेळण्यास नकार दिल्यास संबंधित बोर्डावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ब्रॉडकास्टरला होणाऱ्या नुकसानीची भरपाई थेट पीसीबीच्या वाट्यातील उत्पन्नातून कापून घेण्याचा कठोर पर्यायही आयसीसीकडे उपलब्ध आहे. आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तान बोर्डासाठी हा निर्णय "आगीतून फुफाट्यात" पडण्यासारखा ठरू शकतो.

चाहत्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर

शेवटी, क्रिकेट हा चाहत्यांचा आवडता खेळ आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूला असलेल्या करोडो प्रेक्षकांसाठी हा सामना म्हणजे एका उत्सवासारखा असतो. राजकीय मतभेदांमुळे जेव्हा खेळाचे मैदान रिकामे राहते, तेव्हा खेळाचा आत्मा दुखावला जातो. आता आयसीसी या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मध्यस्थी करणार की 2026 चा विश्वचषक या सर्वात मोठ्या वादासाठी ओळखला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: UGC NET Result: अखेर प्रतीक्षा संपली; 'या' तारखेला UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर होणार; रिझल्ट कसा पाहायचा?


सम्बन्धित सामग्री