SJ-100 Civil Aircraft: भारतातील विमान उद्योगासंदर्भातील मोठी बामती समोर येत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाची युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (PJSC-UAC) यांनी नागरी प्रवासी विमानांच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार 27 ऑक्टोबर 2025 रोजी मॉस्को येथे करण्यात आला.
ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या
HAL च्या वतीने प्रभात रंजन, तर PJSC-UAC च्या वतीने ओलेग बोगोमोलोव्ह यांनी MoU वर स्वाक्षरी केली. या वेळी HAL चे CMD डॉ. डी. के. सुनील आणि UAC चे महासंचालक वादिम बडेका हे देखील उपस्थित होते. या भागीदारीनंतर HAL ला भारतातील ग्राहकांसाठी SJ-100 नागरी विमानांचे स्थानिक उत्पादन करण्याचा अधिकार मिळणार आहे. दोन्ही देशांमधील वाढता तांत्रिक विश्वास आणि सहकार्य याचे हे प्रतीक मानले जात आहे.
हेही वाचा - Shehbaz Sharif Claim Fact Check: पाकिस्तानचा भांडाफोड! शाहबाज शरीफ यांचा भारताबाबतचा खोटा दावा उघड; एक्सने सांगितलं सत्य
‘SJ-100’ भारतासाठी गेम चेंजर ठरणार
SJ-100 हे नॅरो-बॉडी प्रवासी विमान असून, जगभरात याच्या 200 हून अधिक युनिट्स वापरात आहेत. सध्या हे विमान 16 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स चालवत आहेत. भारतातील उडान (UDAN) योजनेअंतर्गत ही विमाने लघु आणि मध्यम अंतराच्या उड्डाणांसाठी क्रांतिकारी बदल घडवू शकतात.
हेही वाचा - Turkey Earthquake: पश्चिम तुर्कीला भूकंपाचा जोरदार धक्का; इमारती कोसळल्या, नागरिक झाले भयभीत
तज्ञांच्या मते, पुढील दशकात भारताला 200 हून अधिक प्रादेशिक जेट्सची आवश्यकता असेल, तर हिंद महासागर परिसरातील आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी सुमारे 350 विमानांची मागणी अपेक्षित आहे. SJ-100 विमान या मागणीची मोठ्या प्रमाणावर पूर्तता करू शकते.
स्वावलंबी भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल
या प्रकल्पामुळे भारत प्रथमच स्वदेशात नागरी प्रवासी विमानांचे उत्पादन करणार आहे. यापूर्वी, HAL ने 1961 मध्ये AVRO HS-748 विमानांचे उत्पादन केले होते, जे 1988 मध्ये बंद झाले. SJ-100 विमान निर्मितीमुळे भारताच्या नागरी विमान वाहतूक उद्योगात 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ तांत्रिक स्वावलंबनच नव्हे तर अनेक रोजगार संधी देखील निर्माण होतील.