Wednesday, November 19, 2025 02:04:14 PM

India Vs Bangladesh : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना; पावसाने खेळ बिघडवला; भारताचा खात्रीशीर विजय हातातून गेला

डायनॅमिक सुरुवात करूनही पावसाने भारताचा विजय रोखला. नवी मुंबईतील भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द, तरीही उपांत्य फेरीतील भारताचे स्थान कायम.

india vs bangladesh  भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना पावसाने खेळ बिघडवला भारताचा खात्रीशीर विजय हातातून गेला

मुंबई : नवी मुंबईत पावसाने भारताच्या विजायाचा खेळ बिघडवला आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मधील भारत-बांगलादेश साखळीतील शेवटचा सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवायचा होता. मात्र, सततच्या पावसामुळे हा सामना अखेर रद्द करावा लागला आणि भारतीय संघाच्या विजयाचा खात्रीशीर घास पावसाने हिसकावून घेतला.

सामन्याच्या सुरुवातीलाच पावसाची सक्रियता पाहायला मिळाली. टॉसला जवळपास 35 मिनिटांचा विलंब झाला. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसानंतर प्रथम 43 षटकांचा सामना जाहीर करण्यात आला. मात्र पुन्हा मुसळधार पावसाने अडथळा आणला आणि स्पर्धेच्या नियमांनुसार सामन्याचे स्वरूप 27 षटकांवर आले.

27 षटकांत बांगलादेशने 9 विकेट्स गमावत 119 धावा केल्या. शर्मिन अख्तरने सर्वाधिक 36 धावा तर शोभना मोस्त्रीने 26 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांपैकी राधा यादवने 3 बळी घेत प्रभावी कामगिरी केली. श्री चरणीने 2 विकेट्स घेतल्या. तर रेणुका सिंह ठाकूर, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

हेही वाचा: Matheran Mini Train: 1 नोव्हेंबरपासून माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावणार; पर्यटकांनो! अनुभवा हिरवाईतील रम्य सफर

डीएलएस नियमानुसार भारतासमोर 126 धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले. भारतीय सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. स्मृती आणि अमनजोत या जोडीने केवळ 8.4 षटकांत बिनबाद 57 धावा करत सामना आपल्या ताब्यात ठेवल्याचे संकेत दिले होते. स्मृती 34 तर अमनजोत 15 धावांवर नाबाद होती.

पण निर्णायक क्षणी पावसाने पुन्हा आगमन केले आणि खेळ सुरू ठेवणे शक्यच राहिले नाही. बराच वेळ प्रतीक्षा करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अंपायरांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेश पराभवापासून बचावला आणि भारताचा सहज विजय नोंदवण्याचा मार्ग पावसामुळे अडला.

या निकालामुळे भारतीय महिला संघाची गुणतालिकेतील स्थिती कायम राहिली असून भारताने याआधीच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा प्रवास साखळी फेरीतच थांबला आहे.

हेही वाचा: Phaltan Doctor Death Case: चार महिने त्यांच्यात..., आरोपी बदनेसोबतचा वाद काय?; वकिलांचा न्यायालयात खळबळजनक दावा


सम्बन्धित सामग्री