Wednesday, February 18, 2026 07:46:53 AM

India Vs South Africa T20: आधी बॅटने धोपटलं, मग बॉलिंगने रोखलं; आफ्रिकेला भारतीय खेळाडूंनी पाणी पाजलं, सराव सामन्यात नेमकं काय घडलं?

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली फलंदाजी आणि गोलंदाजीत संतुलित कामगिरी करत भारताने आत्मविश्वास वाढवला आहे.

india vs south africa t20 आधी बॅटने धोपटलं मग बॉलिंगने रोखलं आफ्रिकेला भारतीय खेळाडूंनी पाणी पाजलं सराव सामन्यात नेमकं काय घडलं

मुंबई: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या मुख्य मोहिमेपूर्वी टीम इंडियाने इरादे स्पष्ट केले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 241 धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 210 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून आता सर्वांचे लक्ष 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या युएसए विरुद्धच्या पहिल्या अधिकृत सामन्याकडे लागले आहे.

भारतीय फलंदाजांची तुफानी फटकेबाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर इशान किशनने 53 धावांची धडाकेबाज खेळी करत पाया रचला, तर अभिषेक शर्माने 24 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, इतर फलंदाजांना सरावाची संधी मिळावी या रणनीतीअंतर्गत हे दोन्ही फलंदाज 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदानाबाहेर परतले. त्यानंतर तिलक वर्माने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार सूर्या आणि हार्दिक पंड्या या दोघांनीही प्रत्येकी 30 धावा कुटत मधल्या फळीत आपली चमक दाखवली. अष्टपैलू अक्षर पटेलने नाबाद 35 धावा फटकावत धावसंख्येला 240 च्या पार नेले.

हेही वाचा: Ajit Pawar plane Crash Case: दादांच्या अपघाताचं गूढ अखेर उलघडणार! सहा दिवसांच्या तपासणीनंतर ब्लॅक बॉक्सबद्दल मिळाली महत्त्वाची माहिती

नऊ गोलंदाजांचा 'प्रयोग' यशस्वी

भारतीय संघाने या सामन्यात आपला बेंच स्ट्रेंथ आणि अष्टपैलू खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी चक्क नऊ गोलंदाजांचा वापर केला. कर्णधार सूर्या आणि यष्टिरक्षक इशान किशन वगळता संघातील सर्वच खेळाडूंनी गोलंदाजीत हात आजमावला. यामध्ये अभिषेक शर्माने सर्वाधिक दोन बळी घेत सर्वांचे लक्ष वेधले. अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. भारताच्या या विविधतेमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना ठराविक अंतराने धक्के बसत राहिले.

ट्रिस्टन स्टब्सची झुंजार खेळी व्यर्थ

241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार एडन मार्करम (38) आणि रायन रिकेल्टन (44) यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजीसमोर ते मोठी खेळी करू शकले नाहीत. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर स्वस्तात बाद झाल्याने आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या. मात्र, अखेरच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्सने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत सामन्यात चुरस निर्माण केली. स्टब्सने अवघ्या 21 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 45 धावा चोपल्या, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला.

वर्ल्ड कपच्या मोहिमेसाठी टीम इंडिया सज्ज

सराव सामन्यातील या दणदणीत विजयामुळे भारताने प्रतिस्पर्धी संघांना धोक्याची घंटा वाजवली आहे. फलंदाजीतील आक्रमकता आणि गोलंदाजीतील वैविध्य यामुळे टीम इंडिया संतुलित दिसत आहे. हर्षित राणा आणि रिंकू सिंग यांनीही मैदानात हजेरी लावत सराव पूर्ण केला. आता 7 फेब्रुवारीला युएसए विरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया याच विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. विश्वचषकाचे स्वप्न उराशी बाळगून निघालेल्या या 'यंग ब्रिगेड'कडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

हेही वाचा: India America Trade Deal: रशिया की अमेरिका? भारताच्या 'राजकीय' खेळीने महासत्तांमध्ये जुंपली; कोणाचा दावा खरा?


सम्बन्धित सामग्री