Thursday, March 12, 2026 10:34:39 PM

India Vs South Africa: अहमदाबादचं तेच मैदान अन् पुन्हा एकदा टीम इंडियाचं स्वप्नभंग; दक्षिण आफ्रिकेने थांबवली भारताची विजयी मालिका

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय फलंदाजी कोसळली असून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आता टीम इंडियासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

india vs south africa अहमदाबादचं तेच मैदान अन् पुन्हा एकदा टीम इंडियाचं स्वप्नभंग दक्षिण आफ्रिकेने थांबवली भारताची विजयी मालिका

अहमदाबाद: खेळामध्ये पराभवाच्या काही जखमा वेळेनुसार भरून निघतात, पण काही मैदाने त्या जखमांच्या आठवणी पुन्हा ताज्या करतात. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी असेच एक 'दुर्दैवी' मैदान ठरत आहे. 19 नोव्हेंबर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची पुनरावृत्ती काल पुन्हा एकदा याच मैदानावर अवतरली. टी-20 विश्वचषक 2026 च्या 'सुपर 8' फेरीत भारतीय संघाचा विजयी वारू दक्षिण आफ्रिकेने चक्क 76 धावांच्या भल्यामोठ्या फरकाने रोखला. सलग चार विजयांच्या दिमाखात मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवच्या सेनेला या स्पर्धेतील पहिल्यावहिल्या पराभवाचा कडवा घोट प्यावा लागला.

नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमच्या बाजूने लागला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी सुरुवातीलाच अचूक मारा करत अवघ्या 20 धावांवर आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडून आफ्रिकेच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे डेवाल्ड ब्रेव्हिस (45 धावा), डेव्हिड मिलर (63 धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 44 धावा) या तिघांनी सिद्ध करून दाखवले. सुरुवातीच्या पडझडीनंतर या तिघांनी भारतीय गोलंदाजांवर जो प्रतिहल्ला चढवला, तो खरोखरच पाहण्यासारखा होता. या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 187 धावांचा डोंगर उभा केला.

हेही वाचा: Maharashtra Weather: फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा! मुंबईसह राज्यभर उकाडा वाढला; पुढील काही दिवस...

विजयासाठी 188 धावांचे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून एका चुरशीच्या लढतीची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. केवळ शिवम दुबे (42 धावा) यानेच एकाकी झुंज देत आफ्रिकन गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या बाजूने कुणाचीही भक्कम साथ मिळाली नाही. दुबे वगळता एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. परिणामी, संपूर्ण भारतीय संघ 18.5 षटकांत अवघ्या 111 धावांवर गारद झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि वेगाच्या जोरावर भारतीय फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पाडले. उंचपुऱ्या मार्को यान्सेनने भेदक मारा करत सर्वाधिक चार बळी टिपले आणि भारताच्या डावाला मोठे खिंडार पाडले. उरलीसुरली कसर फिरकीपटू केशव महाराजने एकाच षटकात तीन बळी घेत भरून काढली. कॉर्बिन बॉशने दोन तर कर्णधार एडन मार्करमने एक बळी घेत यान्सेन आणि महाराज यांना योग्य साथ दिली. या दमदार विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे.

साखळी फेरीत सलग चार विजयांची नोंद करत दिमाखात 'सुपर 8' मध्ये प्रवेश केलेल्या टीम इंडियाचा हा पराभव नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवला आता या पराभवाच्या धक्क्यातून संघाला लवकरात लवकर बाहेर काढावे लागेल.

अहमदाबादच्या मैदानावरील पराभवाची मालिका खंडित करण्यात भारताला जरी अपयश आले असले तरी, विश्वचषकाचा प्रवास अद्याप संपलेला नाही. उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघाला आता चुकांमधून धडा घेत पुढील सामन्यांमध्ये राखेतून भरारी घेणाऱ्या 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे झेप घ्यावीच लागेल. 

हेही वाचा: Devendra Fadnavis On Narhari Zirwal : "त्या प्रकरणामध्ये कुठेही मंत्र्याचं नाव नाही" फडणवीसांकडून झिरवाळांना क्लिनचीट


सम्बन्धित सामग्री