मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या वर्ल्ड कपमध्ये केलेल्या ऐतिहासिक कामगिरीने संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या विजयामुळे केवळ क्रीडाजगताच नव्हे, तर व्यावसायिक जगतात ही उत्साह निर्माण झाला आहे. भारतीय महिला खेळाडूंनी ब्रँड व्हॅल्यूत मोठी झेप घेतली असून, त्यांना जाहिरात करारांची ऑफर मिळत आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 25% ते 100% पर्यंत वाढ झाली आहे.
संघातील प्रमुख खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा आणि शैफाली वर्मा यांच्याकडे सतत नवे एंडोर्समेंट ऑफर्स येत आहेत. विशेष म्हणजे, जेमिमाच्या ब्रँड व्हॅल्यूत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. ‘बेसलाइन व्हेंचर्स’चे व्यवस्थापकीय संचालक तुहिन मिश्रा यांनी सांगितले की, “वर्ल्ड कप फायनलनंतर ब्रँड्सकडून सतत चौकशा येत आहेत. काही कंपन्या जुन्या करारांना वाढीव मानधनावर नूतनीकरण करू इच्छित आहेत. सरासरी फीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.” हे दाखवते की महिला क्रिकेट आता केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता मोठ्या व्यावसायिक बाजाराचा भाग बनले आहे.
हेही वाचा: Budget Trip: परदेशात फिरायला जायचंय पण बजेट नाही? काळजी नको! भारतातच आहे असं अप्रतिम सुंदर ठिकाण
सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार 125 धावांची खेळी करणारी जेमिमा रॉड्रिग्ज आता कंपन्यांची पहिली पसंती ठरली आहे. JSW Sports चे कमर्शियल हेड करण यादव यांच्या म्हणण्यानुसार, “फायनलनंतर 10 हून अधिक ब्रँड्सकडून ऑफर आल्या आहेत. जेमिमा सध्या एका एंडोर्समेंटसाठी 75 लाख ते 1.5 कोटी रुपये घेते.” ही वाढ तिच्या लोकप्रियतेचे आणि देशातील महिला क्रिकेटच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतीक आहे. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आधीपासूनच देशातील सर्वात महागडी महिला क्रिकेटपटू आहे. ती Nike, Hyundai, SBI, Herbalife, Gulf Oil आणि PNB MetLife सारख्या मोठ्या कंपन्यांसोबत जोडलेली आहे. तिच्या एका जाहिरात कराराची किंमत सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपये आहे.
भारतीय संघाच्या विजयावर अनेक मोठ्या कंपन्यांनी सोशल मीडियावर अभिनंदन मोहिमा सुरू केल्या. Hindustan Unilever, Pepsi, Puma, Swiggy Instamart आणि Surf Excel यांनी महिला खेळाडूंना सलाम केला. Surf Excel ने आपल्या “दाग अच्छे हैं” या मोहिमेत महिला क्रिकेटर्सचा सन्मान केला, तर Puma ने लिहिले, “प्रत्येक संघर्ष आता विजयात बदलला आहे. हरमनप्रीत कौर आता विश्वविजेती कर्णधार आहे.” या विजयानंतर भारतीय महिला क्रिकेटचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. खेळाडूंची बाजारमूल्य, ओळख आणि चाहतावर्ग झपाट्याने वाढत आहेत. या यशामुळे देशातील तरुणींना प्रेरणा मिळेल आणि महिला क्रिकेटला पुढील काही वर्षांत आणखी भक्कम स्थान मिळेल, अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
हेही वाचा: Donald Trump: अणुशस्त्र चाचण्यांवरून ट्रम्प आणि पाकिस्तान आमनेसामने; आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी व्यक्त केली चिंता