USD vs INR: भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. दुसऱ्या तिमाहीत प्रभावी जीडीपी वाढीचे आकडे असूनही, 1 डिसेंबर रोजी भारतीय रुपया आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर आला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 89.76 वर घसरला, जो जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वीच्या 89.49 च्या नीचांकी पातळीपेक्षा कमी आहे. यामुळे 1 डॉलरचे मूल्य सुमारे 90 रुपयांवर पोहोचले आहे. तथापि, त्यानंतर रुपया सावरला आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कमकुवत भांडवली प्रवाह, वाढती आयात मागणी आणि जागतिक अस्थिरतेमुळे दबाव वाढत होता. त्यातच कंपन्यांनी वाढत्या खर्चाच्या भीतीने हेजिंग वाढवल्याने रुपयाची घसरण अधिक तीव्र झाली आहे.
40 वर्षांच्या घसरणीचा प्रवास
रुपयाची डॉलरसमोरची कमजोरी नवीन नाही. ती जवळपास चार दशकांपासून सलग वाढत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
1983: रुपया प्रथमच डॉलरसमोर 10च्या पुढे गेला.
1991: पेमेंट बॅलन्स संकटात तीव्र घसरण; चलन 20–30च्या दरम्यान कोसळले.
1998: आशियाई आर्थिक संकट आणि अणुचाचणीनंतरच्या निर्बंधांमुळे रुपया 40 च्या पुढे.
2008: जागतिक आर्थिक संकटात 50 च्या वर.
2013: 'टेपर टॅंट्रम'मुळे 60च्या पुढे.
2018: तेलदर वाढ व मजबूत डॉलरचा फटका; रुपया 70 वर.
2022: रशिया–युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 80च्या पुढे.
2025: सलग आठ महिन्यांच्या घसरणीनंतर आता 90च्या पुढे. आशियातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक.
रुपया का घसरतोय?
कमकुवत भांडवली प्रवाह
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी यंदा तब्बल 17 अब्ज डॉलरची विक्री केली आहे. आयपीओ आणि प्रायव्हेट इक्विटी एक्झिटमधील मोठ्या विक्रीमुळे निव्वळ प्रवाह नकारात्मक झाला.
FDI कमी
गेल्या दोन महिन्यांपासून थेट परकीय गुंतवणूकही निव्वळ नकारात्मक आहे. भारतीय कंपन्या परदेशात अधिक मालमत्ता विकत घेत आहेत, तर परदेशी गुंतवणूकदार आधीचा नफा परत नेत आहेत.
हेही वाचा - Rupee Depreciation : एका डॉलरसाठी आता तब्बल 90 रुपये मोजावे लागणार! तरीही, RBI ची 'हस्तक्षेप न करण्याची' भूमिका कायम
रिकॉर्ड व्यापार तूट आणि अमेरिकन टॅरिफ्सचा परिणाम
सोन्याची वाढती आयात व मंदावलेली निर्यात यामुळे ऑक्टोबरमध्ये व्यापार तूट उच्चांकावर. रुपया कमकुवत होत असल्याने आयातदारांनी हेजिंग वाढवले. निर्यातदार मात्र डॉलर विकण्यास टाळाटाळ करत आहेत. तथापी, भारतीय वस्तूंवरील वाढत्या यूएस टॅरिफमुळे निर्यात मागणी कमी झाली असून, परदेशी गुंतवणूकदारही सावध झाले आहेत.
हेही वाचा - Illegal Loan Apps: 87 बेकायदेशीर लोन अॅप्स ब्लॉक; डिजिटल फसवणुकीवर सरकारचा मोठा घणाघात
आरबीआयचा मर्यादित हस्तक्षेप
रिझर्व्ह बँकेने स्पॉट आणि फॉरवर्ड मार्केटमध्ये डॉलर्सची विक्री वाढवली आहे. फॉरवर्ड पोझिशन 63 अब्ज डॉलरवर पोहोचली, परंतु नैसर्गिक समायोजन रोखू न देता घसरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉलरसमोर रुपया 90च्या पुढे जाणे हे केवळ अल्पकालीन धक्क्यांचे परिणाम नसून, अनेक वर्षांपासून साचलेल्या संरचनात्मक आव्हानांचे द्योतक आहे. जागतिक घटकांची अनिश्चितता, व्यापार तूट, कमजोर प्रवाह आणि वाढती हेजिंग मागणी यामुळे चलनावरील दबाव कायम आहे. रुपयाच्या घसरणीमुळे पुढील काही महिने बाजारातील अस्थिरता वाढू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.